पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आपलाच उमेदवार विजयी होण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप नेते आमनेसामने आले आहेत. चिंचवड राखण्यासाठी भाजपने आणि महाविकास आघाडीने दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवले आहे. भाजपने जोर लावल्यामुळे महाविकास आघाडीनेही या निवडणुकीत प्रचंड जोर लावला आहे. आजही भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते निवडणूक प्रचारात उतरणार असल्याने आज चिंचवडचं राजकारण चांगलंच तापणार आहेत.
चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप या निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना तिकीट दिलं आहे. ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी या मतदारसंघात बंडखोरी केली आहे. कलाटे यांना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. आंबेडकर यांची ठाकरे गटाशी युती आहे. तरीही आंबेडकर यांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने आघाडीत खळबळ उडाली आहे.
चिंचवडसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज नाना काटे यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे शरद पवार कुणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पवार यांच्या सभेला कसा प्रतिसाद मिळतो याकडेही संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं आहे. शरद पवार चिंचवडमध्ये असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा प्रचार करणार आहेत.
एकनाश शिंदे चिंचवडमध्ये रोड शो करणार असून जाहीर सभा घेणार आहेत. शिंदे यांच्या निशाण्यावर ठाकरे गट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यानंतरची एकनाथ शिंदे यांची चिंचवडमधील ही पहिलीच सभा असणार आहे. त्यामुळे शिंदे यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन तीन वेळा मीडियाशी संवाद साधत शिंदे गटावर हल्ला चढवला होता. ठाकरे यांच्या या आरोपांना शिंदे आज प्रत्युत्तर देणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
याशिवाय भाजपचे नेते आशिष शेलार आणि चित्रा वाघ हे सुद्धा आज अश्विनी जगताप यांच्यासाठी प्रचार करणार आहेत. त्याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या प्रचार रॅलीत असणार आहेत.
याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही आज चिंचवडमध्ये सभा होणार आहे. आंबेडकर हे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. आजच्या सभेत आंबेडकर यांच्या निशाण्यावर भाजप असणार की राष्ट्रवादी? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.