सातारा | 16 ऑक्टोबर 2023 : पितृपक्ष संपला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे रिपाइं नेते रामदास आठवले यांनीही एका मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे या विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला गच्छंती हे पाहावं लागणार आहे. मात्र, असं असलं तरी या विस्तारापूर्वीच राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यताच देसाई यांनी वर्तवल्याने खळबळ उडाली आहे.
शंभूराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे. हे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. शंभूराज देसाई यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
दसरा-दिवाळीत नेहमीच मोठे धमाके होत असतात. यावेळीही मोठा धमाका होणार आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे, असा गौप्यस्फोटही शंभूराज देसाई यांनी केला. त्यामुळे शरद पवार गटातील कोणता नेता महायुतीत येणार याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गटातील एकच नेता येणार की आणखी काही नेते येणार याबाबतची गुप्तता राखण्यात आली आहे. देसाई यांनीही त्याबाबत बोलणं टाळलं. पण त्यांनी राज्यात मोठा भूकंप होणार असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हा विस्तार काही ना काही कारणाने पुढे जात गेला. विस्तार होणार एवढीच माहिती मीडियाला वारंवार दिली गेली. पण कधी होणार हे सांगितलं नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील इच्छूक चांगलेच अस्वस्थ झाले होते. मात्र, एक दिवस अचानक मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण त्यात शिंदे गट किंवा भाजपचे इच्छूक आमदार नव्हते. तर थेट अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शपथविधी झाला. अजितदादा यांचा गट भाजप सरकारला येऊन मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराला का विलंब होत होता याचं उत्तरही मिळालं होतं. आताही मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. केवळ विस्तार होणार एवढंच सांगितलं जातं.
आता, शरद पवार गटातील आणखी नेते महायुतीसोबत येणार आहेत. त्यामुळेच कदाचित विस्ताराला विलंब होत असावा, असं देसाई यांनी सांगितलं. त्यामुळे देसाई यांच्या या म्हणण्यात तथ्य वाटत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. शिवाय देसाई हवेतील गप्पा मारत नाहीत. ठोस आणि मुद्द्याचंच बोलणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळेही त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याचं मानलं जात आहे.