राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज त्यांच्या कन्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कौतुक करताना काहीसे भावनिक झालेले बघायला मिळाले. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी जास्त चुरशीची झाली. विशेष म्हणजे पवार कुटुंबातीलच दोन महिलांमध्ये ही निवडणूक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या लेक तथा अजित पवार यांच्या बहीण सुप्रिया सुळे या मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात होते. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. या विजयानंतर सुप्रिया सुळे यांचं बारामती लोकसभा मतदारसंघात अभिनंदन केलं जात आहे.
बारामतीत डॉक्टरांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवारांनी सर्व डॉक्टरांना संबोधित केलं. यावेळी ते सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना गलबलले. “सुप्रिया सुळे इथे असणे अपेक्षित होतं. सुप्रिया सुळे यांच्या मुलाचे कॅनवोकेशन लंडनला आहे. आज संध्याकाळी विमानाने तिकडे निघत आहेत. त्यामुळे त्या इकडे नाहीत. मुलगी इथे नाहीये आणि बापाचे कौतुक चाललं आहे. इथे कुणाला एक मुलगी आहे का? एकच मुलगी असल्याने अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अधिवेशन काळात वेगवेगळ्या पक्षाचे खासदार आमच्या घरी असतात. त्यांच्याशी संवाद सुप्रियाने ठेवला आहे”, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या लेकीचं कौतुक केलं.
“मी 14 वेळा निवडणूक लढलो. काही निवडणुका संघर्षाची होती. बारामतीकरांचे वातावरण नेहमी वेगळे असते. त्याकाळी लोकांमध्ये तारतम्य होतं. आम्ही टीका करताना शब्दांची मर्यादा ठेवून टीका करायचो. बारामतीची निवडणूक वेगळी होती. जेव्हा मी सभेला जातो तेव्हा मी समोर बसलेल्या लोकांच्या डोळ्यात पाहतो त्यावरुन मला अंदाज येतो. बारामती मतदारसंघाची चिंता मला वाटत नाही”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.