राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना जमीन न विकण्याची कळकळीची विनंती केली. शरद पवार हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील विविध गावांना ते भेटी देत आहेत. या दरम्यान लोणी भापकर या गावी आले असता शरद पवार यांनी शेतकऱ्यांना जमीन न विकण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवारांनी जमीन घेणाऱ्या एजंट लोकांना गावात फिरू न देण्याचादेखील सल्ला गावकऱ्यांना दिला. “काही करा. पण जमीन विकू नका. पुणेकर, मुंबईकर येतील. पण जमीन तर आपली आहे. काही ना काही मार्ग निघतो. तुम्ही काही काळजी करू नका. कोणी एजंट गावात येत असेल तर त्याला गावात येऊ देऊ नका”, असं आवाहन शरद पवारांनी गावकऱ्यांना केलं.
“पिकविणाऱ्याने पिकवले नाही तर खाणारा काय खाईल? पिकविणारा उद्ध्वस्त झाला तर खाणारा पण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान राज्यात येतात आणि एकाच व्यक्तीला लक्षात ठेवतात. यातून सुटका करायची असेल तर त्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल. मी ठरवलं आहे की, राज्यात बदल करायचा. महाराष्ट्राचे राज्य हातात घ्यायचंय”, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.
“सगळीकडे चर्चा होती, बारामतीमध्ये काय होणार? पण मला विश्वास होता. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीकर मोठं मतदान करतील ही खात्री होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी १.५० लाख मतांनी निवडून आले आणि तुमच्या उमेदवार १.८० लाख मतांनी निवडून आल्या. मोदींना माहिती नाही, बारामतीची गॅरंटी काय असते. मोदी आणि माझं काही वाकडं नाही, त्यांचं धोरण चुकीचं आहे. त्यांचं धोरण आपल्या हिताचं नाही. त्यांचं धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.
दरम्यान, बारामतीच्या मोरगाव येथे देखील शरद पवार यांच्या जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. “बारामती लोकसभा निवडणुकीची संपूर्ण देशात चर्चा झाली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, काही लोकांनी दमदाटी केली. नवीन लोकांना आवर घालण्याचे काम काही लोकांनी केलं. पण या वेळेस निवडणूक सामान्य आणि कष्टकरी लोकांनी हातात घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात 18 ठिकाणी प्रचार केला. त्या 10 ठिकाणी उमेदवार पडला. मोदींनी उद्याच्या विधानसभा निवडणुकीत जास्त ठिकाणी प्रचारासाठी यावं. मोदी महाराष्ट्र राज्यात येऊन त्यांनी मोदी गॅरंटी सांगितली पण त्यांची गॅरंटी कामाला आली नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या”, असं शरद पवार म्हणाले.