शंकर देवकुळे, सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून वेगाने घडामोडी सुरु आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा केला जात आहे. त्याचवेळी बहुसंख्य आमदार आमच्यासोबत असल्याचा दावासुद्धा केला जात आहे. या सर्व प्रकारात सांगली जिल्ह्यातील आमदार कोणासोबत आहे? याची माहिती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आता जिल्हा पातळीवर जाणार आहे. दोन्ही गटा काटी ठिकाणी कार्यालयांवर दावा करत आहे. त्यामुळे शिवसेनेचे जसे दोन गट झाल्यानंतर परिस्थिती झाली होती, तशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात एक बैठक आमदारांनी घेतली. त्या बैठकीला तासगावच्या आमदार सुमन पाटील, शिराळा येथील आमदार मानसिंगराव नाईक, विधानपरिषद आमदार अरुण लाड उपस्थित होते. या आमदारांनी सांगली जिल्हा जयंत पाटील यांच्या मागे उभा असल्याचा दावा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आपला पाठिंबा असल्याचे सुमन पाटील, मानसिंगराव नाईक, अरुण लाड यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीसुद्धा आमच्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केला. आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, मिरजेचे नेते बाळासाहेब होनमोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील यांनी हा दावा केला.