सुनिल थिगळे, पिंपरी चिंचवड : कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (BY Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. २६ फेब्रवारी रोजी मतदान असल्यामुळे २४ फेब्रवारी रोजी प्रचार संपणार आहे. भाजप उमेदवारास पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने आता पवार अस्त्र बाहेर काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: आपण पोटनिवडणूक प्रचाराला जात नसल्याचे स्पष्ट केलंय. पण पक्षाच्या पडत्या काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली त्यांच्याशी दोन शब्द बोलता येईल म्हणून मी आलो असल्याचे स्पष्टीकरणही दिलंय.
पिंपरी चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा झाली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी महिनाभर प्रचार करतो. परंतु पोटनिवडणुकीच्या प्रचारास मी जात नाही. ही निवडणूक चिंचवड भागातील असल्याने मी आलो आहे. चिंचवडचे आणि माझे आगळे वेगळे नाते आहे.
शरद पवार यांनी सांगितली राजीव गांधी यांची आठवण
ज्यावेळी इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा संपूर्ण देशामध्ये राजीव गांधी यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. त्यावेळी मी विरोधात जाऊन निवडणूक लढलो. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी हे पुण्यात सभेसाठी आले होते, त्यांनी विमानातून गर्दी पहिली, अन् अधिकाऱ्यांना विचारले.
अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की ही गर्दी शरद पवार यांच्या सभेला झालीय. नंतर राजीव गांधी यांनीच मला सांगितले होते की मी जिथे सभा घेतल्या तिथले उमेदवार निवडून आले. पण बारामतीत मात्र शरद पवार निवडून आले.
औद्योगिकरणाचे श्रेय यशवंतरावांना
पिंपरी चिंचवड येथे औद्योगिकरण झाले. त्याच संपूर्ण श्रेय हे यशवंतराव चव्हान यांना आहे. त्या काळात आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो. इथं शेती होती आम्ही इथं हुरडा खायला येत होतो. आता इथ सगळी कारखानदारी झाली आहे. दिवस बदलले तसा हा भाग ही बदलला आहे. राज्याचा प्रमुख असताना पिंपरी चिंचवडमध्ये कारखानदारी वाढवायची नाही हा निर्णय मी घेतला होता.
भाजप नेत्याने कारखाना बंद पाडला
ज्या कामगारांना काम मिळालं त्यांना उत्तम काम करण्याचे स्थिती आली असली पाहिजे आणि इथली कारखानदारी उत्तम चालली पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी मला सांगितलं होत की पिंपरी चिंचवड येथील कारखानदारीला नख लावू देवू नका. पण केरळमधून एक कामगार नेते येथे आला. त्यांनी कारखानदारी बंद पाडली. तो नेता भाजपचा राजन नायर होता, असे पवार यांनी सांगितले.
आम्ही चाकण, रांजणगाव, जेजुरी तळेगाव या ठिकाणी एमआयडीसी सुरू केली, असा विचार भाजप कधी करणार नाही, विकासाचा व्यापक विचार त्यांच्याकडे नाही, ते केवळ बोलतात, असा आरोप त्यांनी केला.