प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 15 नोव्हेंबर 2023 : देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू आहे. फटाके फोडून सर्वच जण दिवाळी साजरी करत आहेत. कुटुंब एकत्र येऊन दिवाळीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करताना दिसत आहेत. भेटीगाठी आणि भेटवस्तू देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र, राज्यात पवार कुटुंबाच्या दिवाळीकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांनी वेगळी राजकीय चूल मांडल्याने पवार कुटुंबाच्या दिवाळीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार गोविंदबागेत येतील की नाही ही चर्चा सुरू असतानच अजित पवार यांनी गोविंद बागेत जाऊन दिवाळी साजरी केली. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
अजित पवार यांनी काल संध्याकाळी उशिरा गोविंद बागेत जाऊन दिवाळी साजरी केली. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गोविंद बागेत आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर संध्याकाळी अजित पवार सहकुटुंब गोविंद बागेत आले. सर्वांनी एकत्र जेवण केलं. गप्पा मारल्या. त्यानंतर एकत्रित फोटोही काढले. आज भाऊबीज असल्याने सुप्रिया सुळे या सकाळीच काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या.
सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीत जाऊन अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर दोन तासाने शरद पवारही अजितदादा यांच्या निवासस्थानी आले आहेत. अजितदादा यांच्या घरी भाऊबीजेचा कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने पवार कुटुंब अजितदादांच्या घरी जमलं आहे. या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन दुपारचं जेवण घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काल दिवाळी पाडव्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. अजित पवारही गोविंदबागेत आले होते. या कुटुंबाने दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्र फोटोसेशन केलं. या फोटोत अख्खं पवार कुटुंब दिसत आहेत. शरद पवार यांच्या मागे अजितदादाही दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी कुटुंबातील हे चार फोटो पोस्ट केले आहेत. फेसबुकवर हे फोटो पोस्ट करत त्यावर Blessed! Embracing the beauty of our traditions with pride! असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, पवार कुटुंबाच्या एकत्र येण्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कितीही मतभेद असले तरी एकत्र येणं ही पवार कुटुंबायांची खासियत आहे. तेच त्यांचं वैशिष्ट्ये आहे. दर दिवाळीला पवार कुटुंब एकत्र येतं. यावेळीही आले. पवार कुटुंब एकत्र आले असले तरी त्यांच्यातील मतभेद काही कमी झालेले नाहीत. मतभेद कायम आहेत, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.