पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी भाजप खासदार गिरीश बापट (girish bapat) आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकूश काकडे यांच्या मैत्रीवरून जोरदार टोलेबाजी केली. निमित्त होतं अंकूश काकडे (ankush kakde) यांच्या हॅशटॅग या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. यावेळी पवार आणि बापट यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. गिरीश बापट आणि अंकूश काकडे यांची महानगरपालिकेतील मैत्री सर्वांना माहीत आहे. तेव्हा पुण्यातील अनेक जागा आम्ही जिंकल्या होत्या. पण एक गोष्ट माझ्या लक्षात याची नाही की गिरीश बापट जिथे उभे राहतात तिथून निवडून कसे येतात? असा सवाल करतानाच एकदा कसब्यात की कुठे तरी बापट उभे होते. कसब्यात उभे असताना आम्ही ठरवलं की आता काळजी घेऊया बापटांची. पण आम्हाला त्यात काही यश आले नाही. आता मात्र हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं. गिरीश, शांतीलाल सुरतवाला आणि अंकूश यांची जी काही गट्टी आहे, त्या गट्टीचा आणि त्यांच्या विजयाचा काही संबंध आहे का? हे तपासण्याची वेळ आली आहे, अशी मिश्किल टोलेबाजी शरद पवारांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली.
अंकूश काकडे यांच्या हॅशटॅग या पुस्तकाचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरात हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रसंगी खासदार गिरीश बापटही उपस्थित होते. यावेळी पवारांनी अनेक किस्से ऐकवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बापट-काकडे यांच्या मैत्रीवरून टोलेही लगावले. आम्ही पुण्यात अनेक जागा जिंकल्या. पण गिरीश बापट जिथे उभे राहतात तिथून निवडून कसे येतात हे मला अजूनही लक्षात आलं नाही. एकदा बापट कसब्यातून उभे होते. तेव्हा आम्ही ठरवलं यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही. आता हे पुस्तक पाहिल्यावर याच कारण बापट, अंकुश आणि शांतीलाल यांची मैत्री आहे की काय? असा संबध आहे का? असं वाटत, असं शरद पवार म्हणाले.
आजचं पुणे वेगळं आहे. पुणं पूर्णपणे बदलून गेलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांची लोकसंख्या जवळपास 70 लाख आहे. एवढ्या लोकसंख्येच्या या जुळ्या शहरात अनेक प्रश्न आहेत. पुणे जिल्ह्यात वेगवेगळे छोटेमोठे 1 कोटी पेक्षा जास्त कारखाने आहेत. एका दृष्टीने पुणे जसं शैक्षणिक हब आहे, तसेच रोजगार उपलब्ध करुन देणार पुणे हे महत्वाचे शहर आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी गिरीश बापट यांनीही टोलेपाजी केली. मी बापट असलो तरी काकडे पोपट आहे, असं बापट यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. तुम्ही काकडेंना काहीही द्या. पण भगतसिंह कोश्यारी राज्यपाल आहेत, तोपर्यंत त्यांना विधान परिषद देऊ नका, असा टोला बापट यांनी लगावला. तसेच पुण्यातील गणेशोत्सवात रात्रभर भोंग्यांचा त्रास होतो, असं सांगतानाच त्या भोंग्याचा आणि या भोंग्याचा काहीच संबंध नाही, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. राजकारण हाच व्यवसाय ही सध्याची स्थिती आहे. आजकाल सुशिक्षित लोकं मतदान करत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.