योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 22 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची काल मुंबईत भेट झाली. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आंबेडकर-पवार भेटीने चर्चेचं मोहोळ उठलं आहे. ही राजकीय भेट नव्हती, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केल्यानंतरही आंबेडकर महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ही चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी आंबेडकरांबाबत सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांचा धुरळा उडाला आहे. पवार यांच्या विधानाने पुन्हा एकदा आंबेडकर आघाडीत येणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर इंडिया आणि महाविकास आघाडीत येणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली. इंडिया आघाडीत जे जे लोक येतील त्याचा आनंद आहे. पण कालची बैठक त्यासाठी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने चव्हाण सेंटरला एक कार्यक्रम होता. त्यात माझं भाषण होतं. प्रकाश आंबेडकर आणि कुमार केतकरांचंही भाषण होतं. त्यासाठी एकत्र आलो होतो. तिथं दुसरा काही राजकीय विषय नव्हता, असं शरद पवार म्हणाले.
आंबेडकर आघाडीत असतील की नाही माहीत नाही. मी त्यांच्याशी चर्चा केली नाही. पण व्यक्तिगत मला विचाराल तर ते येत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. पण हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आमच्या इतरांशी संवाद साधूनच निर्णय होईल, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं. शरद पवार यांनीच आता आंबेडकरांना टाळी देणारं सूचक विधान केल्यामुळे आंबेडकर यांचा आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीत गोविंद बागेत एकत्रित येणार का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर तुमचा आजवरचा अनुभव काय आहे? कुणी काही म्हणू द्या. तुमचा अनुभव काय आहे? त्यापलिकडे काय होणार आहे, असं शरद पवार म्हणाले. तसेच माझे वडील बंधू अनंतराव पवार यांच्या नावाने आम्ही संस्था काढत आहोत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला कुटुंबातील सर्व लोकांनी येण्याची अवश्यकता होती. सर्व येतील, असं ते म्हणाले.