प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 25 डिसेंबर 2023 : त्यांनी वयाच्या 38व्या वर्षी बंड केलं. मी वयाच्या 60 व्या वर्षी बंड केलं. वसंतदादा पाटील चांगलं काम करत होते. त्यांना त्यांनी बाजूला केलं, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अजितदादा यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही थेट उत्तर दिलं आहे. आपलं बंड हे बंड नव्हतंच, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. तसेच आता कुणी काय केलं असेल तर त्याच्याबद्दलही तक्रार नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार मीडियाशी संवाद साधत होते.
आमचं बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधार लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. सर्वांनी बसून निर्णय घतेला होता. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.
आता माझंच ऐका कुणाचं ऐकू नका. त्यांचं बरेच वर्ष ऐकलं, असं विधान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. गेली 10 ते 15 वर्ष बारामती आणि त्या भागात माझं लक्ष असत नाही. साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावं आणि कुणी जबाबादराी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही. गेल्या दहा वर्षात एकाही गोष्टीत मी लक्ष दिलं नाही. त्यामुळे कुणालाही काम करण्यात अडचण आणण्याची भूमिका घेतली नाही. परिसराचा नाव लौकिक वाढेल याची काळजी घ्यावी, असं शरद पवार म्हणाले. कुणी कुणाचं ऐकावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली. यात मला आनंद आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. इथून पुढे माझं ऐका. कुणाचंही ऐकू नका. त्यांचं तुम्ही बरीच वर्ष ऐकलं. आता माझं ऐका. मला असा विकास करायचा आहे, तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल, असं अजित पवार म्हणाले होते. तसेच मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी तर वयाच्या 38 व्या वर्षीच वेगळा निर्णय घेतला होता. वसंतदादा पाटील चांगलं काम करत असताना त्यांनीही बाजूला सारण्यात आलं होतं, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.