‘मी काय म्हातारा झालोय? 84 हे काय वय आहे का?’; शरद पवारांचं वक्तव्य, तुफान जिद्द

| Updated on: Nov 13, 2024 | 10:20 PM

"काहींनी भाषणात उल्लेख केला, या वयात मी काम करतोय. मी काय म्हातारा झालोय? बाकी काही बोला, 84 हे काय वय आहे का?", असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मी काय म्हातारा झालोय? 84 हे काय वय आहे का?; शरद पवारांचं वक्तव्य, तुफान जिद्द
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यभरात प्रचारसभांमध्ये जात आहेत. ते प्रत्येक मतदारसंघात जावून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपले उमेदवार निवडून आणायचे, असा निर्धार त्यांनी केलेला दिसतोय. त्यांच्या दौऱ्याचं राज्यभरात कौतुक होत आहे. सर्वसामान्यांमध्ये शरद पवारांची चर्चा होत आहे. शरद पवार वयाच्या 84 वर्षी बेधडकपणे सभा घेत आहेत. प्रवास करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्याविषयी सातत्याने चर्चा होत आहे. विशेष म्हणजे शरद पवार भाषणही तितकच खतरनाक देत आहेत. त्यांची आज पिंपरी चिंचवडमध्येही धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी त्यांची जिद्द दाखवून देणारं एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. “काहींनी भाषणात उल्लेख केला, या वयात मी काम करतोय. मी काय म्हातारा झालोय? बाकी काही बोला, 84 हे काय वय आहे का?”, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टाळ्यांच्या गजरात शरद पवारांच्या वक्तव्याला उपस्थितांकडून प्रतिसाद देण्यात आला. यानंतर शरद पवारांनी आपल्या पुढील भाषणाला सुरुवात केली.

मुख्यमंत्री असताना हिंजवडी येथे साखर कारखाना काढायचा होता. तिथं नारळ फोडलं. मी सांगितलं इथं कारखाना होणार नाही. हिंजवडीची जागा हवीय, असं सांगून तिथं आयटी पार्क करायचं असल्याचं सांगितलं. तिथं आज 5 लाख नागरीक काम करत आहेत. ही जागा चिंचवड देवस्थानची आहे. महानगर पालिकेने जागा मागितली. तिथे आज एक सुंदर उद्यान तयार करण्यात आलं. मुंबई नंतर पुण्यात गर्दी व्हायला लागली असल्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर चाकण, जेजुरी, सासवड, रांजनगाव येथे एमआयडीसी उभारली. हजारो लोकांना रोजगार मिळाला

“ही निवडणूक अत्यंत म्हत्त्वाची आहे. सहा महिन्यांपूर्वी देशाची निवडणूक झाली. मोदी हे त्यांची भूमिका मांडत होते. उद्याच्या निवडणुकीत 400 खासदार निवडून द्या, 350 खासदार आले तर बहुमत मिळतं. 400 खासदार हवे होते. त्यांचं लक्ष हे देशाच्या घटनेवर होतं. त्यात सुधारणा, परिवर्तन करायचं होतं. दिल्लीत एक सर्वपक्षीय बैठक घेतली. सर्वांनी बसून ठरवलं, देशाच्या लोकशाहीवर, घटनेवर हल्ला होत असल्याने आम्ही एकत्रित निवडणूक लढवली. महाराष्ट्रात 48 पैकी 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले”, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

“मुख्यमंत्री आणि सहकारी सांगतायत, लाडकी बहिणीला त्यांनी सन्मान दिला, माझी तक्रार नाही. दुसऱ्या बाजूने स्त्रियांवर अत्याचार वाढले, ठाण्यात दोन मुलींवर अत्याचार झाले, महाराष्ट्राचे देशात नाव खराब झाले. महाराष्ट्रातून 886 मुली गायब झाल्यात. या कुठे गेल्यात याचा पत्ता लागत नाही. ही कसली काळजी तुम्ही घेताय?”, असा सवाल शरद पवारांनी केला.

“महाराष्ट्राची सत्ता आम्हाला दिल्यास शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवू, शेतमालाला भाव देऊ. मूल पदवीधर झालेत पण मुलांना नोकरी मिळत नाही. सुशिक्षित मुलांना 4,400 अनुदान देणार आहोत. याचा विचार आम्ही केलाय. तरुण मुलांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी तुमची मदत हवीय. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील उमेदवारांना विजयी करा”, असं आवाहन शरद पवारांनी केलं.