आमची झोप उडाली, आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत, शरद पवार असं का म्हणाले?

| Updated on: Oct 04, 2024 | 12:04 PM

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांच्याकडून मतदारसंघाचा कल जाणून घेत आहेत. आज शरद पवार सांगलीत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी दिलखुलास संवाद साधला.

आमची झोप उडाली, आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत, शरद पवार असं का म्हणाले?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माजी खासदार संभाजी राजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी राज्यात नवीन आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीचा राज्यातील महाविकास आघाडीला अधिक फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. या आघाडीने विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी या आघाडीवर खोचक आणि मिश्किल टिप्पणी केली आहे.

माजी मंत्री शरद पवार हे आज सांगलीत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्यात नवीन आघाडी तयार झाली आहे. त्याचा तुम्हाला फटका बसणार आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केव्हाही हे लोक एकत्र आल्यावर परिणाम होणारच. संभाजीराजे हे महान घराण्यातील लोकं आहेत. त्यामुळे नक्कीच परिणाम होईल. आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता काय आपलं होणार?, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

शाह चांगलं मार्गदर्शन करत आहेत

शरद पवार यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली. ते बरंच काही बोलतात. हल्ली त्यांचा महाराष्ट्रात मुक्काम वाढला आहे. त्यांना महाराष्ट्र आवडतो असं ऐकलं. त्यांचं कोल्हापूरचं कनेक्शन आहे. सासूरवाडी आहे…? मग साहजिकच आहे. ते येतात. भाषणं करतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा. विरोधी पक्ष फोडा. कायदा सुव्यवस्था यांच्या हातात आहे. ते चांगलं मार्गदर्शन करत आहेत. याचा निकाल राज्यातील दीड महिन्यात घेतील, असा टोला त्यांनी लगावला.

मोदींनी अधिक सभा घ्याव्यात

मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. कुणी तरी सांगत होतं की, पंतप्रधान मोदींनी 18 ठिकाणी सभा घेतल्या. 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. 18 ठिकाणी सभा घेऊन 14 ठिकाणी पराभव होत असेल तर विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात अधिक या, ही विनंती आहे. इथे आणखी सभा घ्या, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.