पुणे: ईडीकडून होत असलेल्या कारवायांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही ईडीचा गैरवापर केला जात आहे. विरोधकांना नमवण्याचा केंद्राकडून प्रयत्न होत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. (Sharad Pawar slams BJP for misusing Central agencies)
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या यंत्रणांचा आतापर्यंत या देशात असा कधी वापर झाला नव्हता. मात्र, हल्लीच्या सरकारने ही यंत्रणा विरोधकांना नमवण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, राजस्थान मध्यप्रदेश आणि दक्षिणेतील काही राज्यात हेच सुरू आहे. आपण केवळ महाराष्ट्रातील कारवायांवर चर्चा करतो. पण हा गैरवापर महाराष्ट्रापर्यंत सीमित नाही तर हा गैरवापर इतर राज्यातही सुरू आहे, असं पवार म्हणाले.
भाजप आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर पवारांनी खास शैलीत भाष्य केलं. केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. आणखी काही दिवस खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार कटाक्षाने त्या सूचना पाळत आहे. मात्र अन्य घटकांची त्याबद्दल काही मते असू शकतात. त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे. परंतु केंद्र सरकार जेव्हा अशी भूमिका घेतं. तेव्हा कमीत कमी त्यांच्या विचाराच्या राज्यातील लोकांनी तारतम्य ठेवायची गरज होती. याबद्दल मला काही अधिक सांगायचं नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं विधान परिषदेतील आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर पवारांना विचारण्यात आलं असता पवारांनी या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. ते नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादीने जी यादी राज्यपालांना दिली आहे त्यात राजू शेट्टी यांचं नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीत क्षेत्रात योगदान दिलं आहे. ते पाहून त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं असा प्रस्ताव आम्ही राज्यपालांना दिलेला आहे. त्याचा अंतिम निर्णय राज्यापालांकडून आलेला नाही. त्यामुळे अंतिम भूमिका राज्यपालांना घ्यायची आहे. पण आश्चर्य याचं वाटतं अशी विधानं कशी केली जातात? आम्ही आमची कामं प्रामाणिकपणे केली आहेत. राजू शेट्टी यांना काय वक्तव्य करायचं असेल त्यावर भाष्य करायचं नाही. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात त्याची आम्ही वाट बघतोय, असं ते म्हणाले.
दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला जात आहे. त्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. लाठीचार्ज ही गंभीरबाब आहे. त्याही पेक्षा 14 महिने शेतकरी त्या ठिकाणी बसलेत. थंडी, ऊन आणि पाऊस याचा विचार न करता शेतकरी उपोषण करत आहेत. संवेदनशील राजकर्त्याने इतके दिवस अन्नदाता आंदोलन करतोय त्यांची नोंद घ्यायला हवी होती. पण दुर्देव आहे. त्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. (Sharad Pawar slams BJP for misusing Central agencies)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 4 September 2021 https://t.co/SjXs8O3Nsi #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2021
संबंधित बातम्या:
“महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली”, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना जोरदार टोला
(NCP Sharad Pawar slams BJP for misusing Central agencies)