प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 25 डिसेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काल एका कार्यक्रमात आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आंबेडकर इंडिया आघाडीत येणार की नाही यावर उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात आणखी वेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी 48 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. पवार यांनीही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. प्रत्येकाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांची राजकीय संघटना आहे, त्यामुळे ते निर्णय घेऊ शकतात. आमची दिल्लीत बैठक झाली. मी हजर होतो. खरगे, राहुल गांधी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री होते. प्रकाश आंबेडकर यांना इंडियात घेण्याची सूचनामी स्वत: खरगेंकडे केली. उद्धव ठाकरे यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. एकत्रित काम करण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्यांचं स्वागत करतो. ती तयारी सुरू आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही. मोदींसमोर कोणी टिकणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा दाखला दिला. 1977च्या निवडणुकीच्या काळात तुमच्यापैकी काही लोक नसतील. 77 च्या निवडणुकीत एकाही व्यक्तीला पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केलं नव्हतं. त्या निवडणुकीचं वैशिष्ट्ये म्हणजे निवडणूक झाल्यावर पक्षाची निर्मिती झाली. त्यानंतर मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. त्यापूर्वी त्यांचं नाव चर्चेत नव्हतं. त्यामुळे कुणाचं नाव पुढे केलं किंवा नाही गेलं तरी लोकांना बदल करायची मनस्थिती असेल तर लोक बदल करतात. लोकांना संधी मिळेल तेव्हा त्यांचं मत पडेल. त्यावर भाष्य करण्याची काहीही गरज नाही, असं पवार म्हणाले.
निवडणुकीच्या सर्व्हेवरही त्यांनी भाष्य केलं. सर्व्हे येत असतात. काही वेळा खरे ठरतात, काही वेळा नाही ठरत. आता तीन चार राज्याचा निकाल लागला आहे. या चार राज्यांच्या निवडणुकीचा सर्व्हे वेगळा होता. तेलंगणाचा सर्व्हे तर आणखी वेगळा होता. पण तरीही लोकांनी वेगळा निकाल दिला. त्यामुळे सर्व्हे इंडिकेट देतात. पण त्यावर अवलंबून राहून निष्कर्ष काढण्याची गरज नाही. हा माझा अनुभव आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.