बारामती | 2 मार्च 2023 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत मोठ्या घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. बारामतीतील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघीही एकमेकींच्या विरोधात बारामतीच्या रणांगणात दिसणार आहेत. पण त्यापूर्वीच आज या दोघी नणंद-भावजया एकमेकींना भेटल्या आहेत. त्यांच्यासोबत खुद्द शरद पवारही आहेत. त्यामुळे या पवार कुटुंबातील तीन सदस्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात संस्थेची बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार आले आहेत. सोबत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही बैठकीला आहेत. हे तिघेही या संस्थेचे ट्रस्टी आहेत. संस्थेच्या कामाचा आढावा घेतानाच संस्थेशी संबंधित निर्णयही या बैठकीत घेतले जाणार आहेत. यावेळी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची काय चर्चा होते? तसेच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची काही चर्चा होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या बैठकीचं वैशिष्ट्ये म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत एकमेकींविरुद्ध लढण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर या दोघी नणंद भावजया पहिल्यांदाच एकत्र भेटणार आहेत. तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा पहिल्यांदाच एकत्र भेटणार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये काय चर्चा होते? राजकीय चर्चा होणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. बारामतीकरांनाही या भेटीची उत्सुकता लागली आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरच नमो रोजगार मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या महा रोजगार मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे. तिन्ही पक्षांच्या बॅनर्स आणि होर्डिंग्जने बारामती गजबजून गेली आहे. तसेच तिन्ही पक्षांचे चिन्ह असलेले झेंडेही बारामतीत लावण्यात आले आहेत. चौकाचौकात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज बारामतीत येणार असून शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आज बारामतीत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.