जेजुरी (पुणे) : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या 13 फेब्रुवारीला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे. ( Sharad pawar Will Inaugurated Ahilyadevi Holkar Statue jejuri)
जेजुरी गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर जेजुरी देवस्थानने हा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं तब्बल 20 फूट उंचीचा ब्रांझ धातूचा अहिल्यांबाईंचा पुतळा उभारण्यात आला आहे. याच पुतळ्याचं अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
“गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या राजमातांचा पुतळा देवस्थानाच्या वतीने उभारण्यात आलेला आहे. देवस्थान कमिटी कायमच राजमातांच्या क्रांतीकारी विचाराचा वसा घेऊन चालत आहे. चौथऱ्यासह सुमारे 20 फूट उंचीचा पुतळा देवस्थानामार्फत उभारण्यात आला आहे. यासाठी तब्बल 55 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध परवानग्या घेऊन लोकनेते शरद पवार यांच्याहस्ते अनावरण होणार” असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.
औंढा नागनाथच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं राजकारण, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टिमेटम
औंढा नागनाथ येथील अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं अनावरण खरं तर गेल्या वर्षी 16 फेब्रुवारीलाच होणार होतं. मात्र वर्ष उलटूनही या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम पुढच्या 15 दिवसांमध्ये करण्यात यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच पत्राच्या सरतेशेवटी जर अनावरण कार्यक्रम झाला नाही तर समस्त समाज बांधवांच्या हस्ते होळकरांचे वंशज भुषणसिंह होळकरांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
(Sharad pawar Will Inaugurated Ahilyadevi Holkar Statue jejuri)
हे ही वाचा :
‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र
महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप