पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्याचं कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रुग्णालयात धाव घेऊन आईच्या प्रकृतीची विचारपूस केली. देशविदेशातील अनेक राजकारण्यांनी मोदी यांना पत्रं लिहून आणि फोन करून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच मातोश्री हीराबेन यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.
Shri @narendramodi , I read that your mother has been admitted to the hospital, and am relieved to know that she is stable and recovering. I know how close you are with your beloved mother and the special bond you share with her. I wish her a speedy recovery and good health. pic.twitter.com/kP0qlkEVnj
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 29, 2022
तुमच्या मातोश्री अहमदाबादच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तुम्ही त्यांना काल भेटण्यासाठी गेला होतात. तुमच्या आईची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं ऐकून बरं वाटलं. तुमचं तुमच्या आईवर किती प्रेम आहे आणि तुम्ही आईच्या किती जवळ आहात हे मला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील या कठिण प्रसंगाची मला जाणीव आहे, असं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे.
आई हा पृथ्वीवरील सर्वात शुद्ध आत्मा आहे. तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी तुमची आई ऊर्जा आणि निरंतर शक्तीचं स्त्रोत राहिल्या आहेत. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे आणि त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी म्हणून मी प्रार्थना करतो, असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच मोदी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात जाऊन आईच्या तब्येतीची विचारपूस केली.
हीराबेन मोदी यांनी 18 जून रोजी वयाची शंभरी गाठली आहे. वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हीराबेन या सर्वात लहान मुलगा पंकजभाई मोदी यांच्यासोबत गांधी नगर येथे राहत असतात.