अजितदादांच्या विरोधात कुटुंबातील आणखी एक व्यक्ती, घरोघरी प्रचार; सुप्रिया सुळे यांचं बळ वाढलं

| Updated on: Mar 25, 2024 | 7:01 PM

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातील दोन मोठे नेते वेगळे झाले. त्यानंतर आता एकाच कुटुंबातील हे नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. बारामतीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या बारामतीतून लढत आहेत. तर अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार लढत आहेत. त्यामुळे पवार कुटुंब या दोन उमेदवारांमध्ये विभागलं गेलं आहे.

अजितदादांच्या विरोधात कुटुंबातील आणखी एक व्यक्ती, घरोघरी प्रचार; सुप्रिया सुळे यांचं बळ वाढलं
sharmila pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बारामतीत पवार कुटुंबातच जोरदार घमासान सुरू आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि बहीण सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. नणंद भावजयांमध्येच ही लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी हट्टाला पेटले आहेत. अजितदादांना धडा शिकवण्यासाठी शिवतारे यांनी दंड थोपाटल्याने अजितदादांची डोकेदुखी वाढलेली आहे. एकीकडे महायुतीतूनच आव्हान मिळत असतानाच आता पवार कुटुंबातील एक एक सदस्य अजितदादांच्या विरोधात जाऊ लागल्याने अजितदादांची चांगलीच गळचेपी झाली आहे. आता पवार कुटुंबातील आणखी एक व्यक्ती अजितदादांच्या विरोधात गेली आहे.

अजित पवार यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार हे अजितदादांच्या विरोधात गेले आहेत. त्यांनी काका म्हणजे शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांच्या मागे ते खंबीरपणे उभे आहेत. पुतण्या युगेंद्र पवार हे सुद्धा अजितदादांच्या विरोधात गेले असून सुप्रिया सुळेंसाठी प्रचार करत आहेत. आधीच रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासोबत आहेत. आता पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजे अजितदादांची वहिनी आणि श्रीनिवास पवार यांची पत्नी शर्मिला पवार या सुद्धा अजित पवार यांच्या विरोधात गेल्या आहेत. त्यांनी सुप्रिया यांना पाठिंबा दिला आहे.

युवकांचा मोठा प्रतिसाद

शर्मिला पवार या श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत. त्या शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. शर्मिला यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला असून त्यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे. शर्मिला यांनी आज इंदापूरचा दौरा केला. सुप्रिया सुळे यांना मते देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. आमच्या कार्यक्रमांना, रॅलींना आणि सभांना युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही शर्मिला पवार यांनी केला आहे.

विरोधकांना कामधंदा नाही

आम्ही सर्वांनी निवडणुकीत उडी घेतली आहे, आम्ही जी काही भूमिका घेतलीय ती स्पष्ट आहे. बारामती आणि इंदापूरच्या लोकांना सांगण्याची गरज नाही. आता विरोधकांना मुद्दे नाहीत. त्यामुळे ते काहीही प्रचार करत आहेत. विरोधकांना दुसरा काही कामधंदा राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.