अभिजित पोते, पुणे | 16 नोव्हेंबर 2023 : राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ४० आमदारांसह एकनाथ शिंदे भाजपसोबत आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद घेतल्यापासून उद्धव ठाकरे सरकारच्या अनेक योजनांना ब्रेक लावला. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी योजनेला ब्रेक लावला आहे. पुणे येथे सुरु असलेल्या 51 शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्यात आले आहे. आता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथे फक्त 35 केंद्रच सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपावरुन अनेक केंद्र सरकारने बंद केली आहेत. ही योजना बंद करण्याकडे पाऊल म्हणजे उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे.
उद्धव ठाकरे सरकारने शिवभोजन थाळी योजना सुरु केली होती. त्यात एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात आणि वरण दिले जात होते. या केंद्रासाठी राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागात एका थाळीमागे 50 रुपये अनुदान दिले होते तर शहरी भागात 35 रुपये अनुदान एका थाळीमागे देण्यात येत होते. ग्राहकांकडून या थाळीसाठी दहा रुपये घेतले जात होते. परंतु या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्या. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने सरकारकडून व्यक्त केला गेला. यामुळे ही योजना बंद करण्याचा विचार सुरु झाला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शिवभोजन थाळी केंद्राला कायमस्वरूपी टाळे लावण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तब्बल 51 शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्यात आले आहे. यामधील काही केंद्रांमध्ये गैरव्यवहार झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर काही केंद्रचालकांनी परवडत नसल्याने स्वत:हून या योजनेतून माघार घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण 86 शिवभोजन थाळी केंद्र कार्यरत होती. जिल्ह्यात आता केवळ 35 केंद्रच सुरू आहेत.