पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयातील ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच पुणे पोलिसांनी उघड केले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. सुमारे दोन कोटी रुपये किमत असलेले 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे ड्रग्स जप्त केले होते. या ड्रग्स प्रकरणात येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील होता. या ललित पाटील याच्यावर जून महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकरण उघड होताच तो पसार झाला.
ललित पाटील प्रकरणावरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्यावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे. ललित पाटील याच्यासाठी फोन केल्याचा आरोप केला गेला. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे ही या प्रकरणास जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यामुळे या सर्व प्रकरणात महत्वाची भूमिका असलेले रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडून सातत्याने मौन पाळण्यात येते. आता प्रथमच त्यांनी या प्रकरणात मौन सोडले आहे.
ललित पाटील प्रकरणात सत्ताधारी पक्षाकडून दबाब होता का? कोणाचे फोन आले होते का? या विषयावर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी म्हटले की, मला कोणाकडून फोन आला नाही. तसेच आमच्यावर कोणाचाही दबाव नव्हता. आमचे डॉक्टर रुग्णांवर उपचाराचे काम करत होते. कोणत्याही रुग्णासंदर्भात आम्हाला कोणाचाही फोन आला नाही.
ड्रग्स माफिया ललित पाटील याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑक्टोंबर 2020 मध्ये कारवाई करत अटक केली होती. ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर ललित पाटील येरवडा कारागृहात होता. परंतु जून महिन्यापासून तो ससूनमध्ये उपचार घेत होता. 30 सप्टेंबर रोजी पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा सहकारी सुभाष मंडल याला रूग्णालयाच्या गेटवर पकडले. त्याच्याकडून 2.14 कोटी रुपयांच्या 1.71 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले. ललित पाटील रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील एका कर्मचार्यामार्फत हे ड्रग्स देत होता. प्रकरण उघड झाल्यानंतर 2 ऑक्टोबरला एक्स-रेसाठी नेले जात असताना तो रुग्णालयातून फरार झाला.