‘ही तुतारी त्यांच्या डोक्यात वाजलीच नाही’, व्हायरल पत्राला शिवतारेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर

| Updated on: Apr 01, 2024 | 8:41 PM

विजय शिवतारे यांच्यावर टीका करणारं, शिवसैनिक असल्याचा दावा करणारं, निनावी पत्र सोशल मीडियावर काल व्हायरल झालं होतं. या व्हायरल पत्राला आज विजय शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

ही तुतारी त्यांच्या डोक्यात वाजलीच नाही, व्हायरल पत्राला शिवतारेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर
शिवसेना नेते विजय शिवतारे
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याविरोधात व्हायरल झालेल्या पत्राला आता शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांकडून पत्रानेच उत्तर देण्यात आलं आहे. अजितकाका जाधव नावाच्या शिवसैनिकाने हे पत्र लिहिलं आहे. व्हायरल पत्राला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. माणिक निंबाळकर नावाच्या व्यक्तीने हे पत्र आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केलं आहे. माणिक निंबाळकर यांच्या फेसबुक अकाउंटवर विजय शिवतारे यांचे स्वीय सहाय्यक अशी ओळख सांगण्यात आली आहे. शिवतारेंच्या समर्थकांकडून आज शेअर करण्यात येत असलेल्या पत्रात कालच्या पत्राला सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. “खरा शिवसैनिक असल्यास नावासकट पत्र पाठवण्याचं आव्हान आजच्या पत्रात करण्यात आलंय. तू बोगस पत्रप्रपंच केलास हे पहिल्या पत्रातून शिवसैनिकांना ओळखलं होतं. शिवसैनिक कधीही स.न.वि.वि. वगैरे शब्दावलीने पारंपरिक पद्धतीने पत्र लिहित नाहीत. मविआत किती घबराट आहे हे बोगस पत्रामुळे आम्हाला कळलं. खरा शिवसैनिक असल्यास नाव आणि पत्त्यासह पत्र लिहा. शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घ्या”, असं प्रत्युत्तर आजच्या पत्रातून देण्यात आलं आहे.

“काल परवा… “पुरंदरचा तह” या शिर्षकाखाली एका शिवसैनिकाच्या नावाने, निनावी पत्र लिहून, पुरंदरच्या शिवसैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये, संभ्रम निर्माण करण्याची केविलवाणी “हात”चलाखी, पंजा आणि तुतारीवाल्यांनी संगनमताने केली, हे सर्वानाच माहीत आहे. खरं तर छक्के “पंजे” करायलाही डोकं लागतं, कारणं कट्टर शिवसैनिकाच्या पत्राची सुरुवात “जय महाराष्ट्र” म्हणूनच होते, ही तुतारी त्यांच्या डोक्यात वाजलीचं नाही. आणि दुसरं म्हणजे, शिवसैनिक डायरेक्ट विजय शिवतारेंना भिडू शकतो, पाठीवर वार करण्याची शिवसैनिकांची जमात नाही. हे त्यांच्या डोक्याला शिवलेचं नाही”, असं पत्रात म्हटलं आहे.

‘तुमच्या सारख्या निनावी पळपुट्यांना…’

“स्वतःची राजकीय कारकीर्द धोक्यात घालून, विजय शिवतारे लढायला पणं उभा ठाकला, आणि पक्ष हितासाठी व पुरंदरच्या मातीसाठी, वेळप्रसंगी मागे सुद्धा सरला. आणि हे सगळं लपून छपून नाही तरं, छातीठोकपणे केलं, सगळ्यांच्या समोर केलं, त्यासाठी सुद्धा वाघाचं काळीज लागतं. विजय शिवतारे चुकले की बरोबर होते, याचा जाब विचारण्याचा अधिकार आणि हक्क, नक्कीच पुरंदरच्या जनतेला आहे. तुमच्या सारख्या “निनावी” पळपुट्यांना नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे मायबाप जनतेला देण्यासाठी, विजय शिवतारे आणि शिवसैनिक समर्थ आहेत. येणाऱ्या काही दिवसांत पालखी तळावरचं याचा सोक्षमोक्ष लावला जाईल. पुरंदरच्या जनतेनं निश्चिंत रहावे”, असं पत्रात म्हटलं आहे.

‘१२०० कोटींचा पलटुराम कोण आहे?’

“साहेब भेटायला आल्यानंतर मागच्या दाराने पळून जाऊन, परत पुढच्या दाराने, साहेबांचं बोट पकडणाऱ्यांच्या बगलबच्च्यांनी, स्वाभिमानाचे डोस आम्हाला पाजू नयेत. दुसरीकडे चाळीस वर्षांनंतर, छत्रपतींची आठवणं झालेल्यांच्या बगलबच्च्यांनी तर आम्हाला स्वाभिमान शिकवण्याच्या भानगडीतचं पडू नये. पुरंदरच्या जनतेला सगळं ज्ञात आहे. पुरंदर संजीवनीची पोपटपंची कोणी केली, १२०० कोटींचा पलटुराम कोण आहे? फेब्रुवारी २०२४ मध्ये विमान उडवणाऱ्यांचं विमान कुठं उडतं आहे, हे पुरंदरला कळेल काय? कऱ्हा नदीच्या कडेने भिंत बांधून पर्यटन करणारे, तालुका दुष्काळात होरपळत असताना, कुठे पर्यटन करत आहेत? या सगळ्यांची उत्तरं पुरंदरच्या जनतेला द्यावीचं लागतील”, असं शिवतारेंच्या समर्थकाने पत्रात म्हटलंय.

‘होय, विजय शिवतारेंनी पुरंदरचा तह केला’

“पोपटपंची, पलटूराम असा शब्दांचा खेळ करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, फक्त शब्दचं नाही तरं असल्या शब्दांची डिक्शनरीचं आमच्याकडे आहे. शिवसैनिकांनी मनात आणलं तर तुतारीची “पिपाणी” कधी होईल, ते या हाताचे त्या “पंजाला” कळणारही नाही. नावी पत्रासारखे कितीही उद्योग तुम्ही करा, शिवसैनिकांची वज्रमूठ तेवढीच घट्ट होत जाईल. होय, विजय शिवतारेंनी पुरंदरचा तह केला. तो पुरंदरच्या भल्यासाठीच. शिवसैनिक म्हणून आम्ही सर्वजण याचं समर्थनही करतो”, असं पत्रात म्हटलं आहे.