Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचा गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

| Updated on: Oct 13, 2023 | 5:54 PM

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचं थेट नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी तसंच काहीसं वक्तव्य केलंय. पण त्यांनी थेट नाव घेणं टाळलं आहे.

Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचा गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
Follow us on

पुणे | 13 ऑक्टोबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणी भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठा दावा केलाय. सुषमा अंधारे यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल संशय व्यक्त केलाय. ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यावर मंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त असू शकतो, असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय. तर ललित पाटील फरार होण्यामध्ये भाजपच्या एका मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

“आम्ही पोलीस प्रशासनाला हे विचारलं का की, तुम्ही कोणते प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? आम्ही विचारलं का, दत्ता डोकेला अटक केली, त्याला काय-काय विचारलं ते? आम्ही म्हणतोय, तुम्ही दत्ता डोकेला ताब्यात घेतल्यानंतर त्याची नार्कोटेस्ट करा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

“जे टाळाटाळ करत आहेत, जे गिरीश महाजन यांच्या कृपेने या पदावर बसले आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही की ससून रुग्णालयाचे डीन संजय ठाकूर यांच्यावर वरदहस्त कुणाचा आहे. त्यामुळे वरदहस्त असणारी ही सर्व नावे आहेत, संजय ठाकूर यांना तुम्ही त्याच पदावर ठेवाल आणि त्यांच्या समक्ष अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमाल, तर चौकशी कशी होऊ शकेल?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

रवींद्र धंगेकर यांचा मोठा दावा

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील या प्रकरणी आरोप केलाय. पण त्यांनी थेट गिरीश महाजन यांचं नाव घेतलेलं नाही. “ललित पाटील याच्यावर 9 महिन्यांमध्ये काय उपचार केले, रजिस्टर काय आहे, कोण डॉक्टर बघत आहेत, कोण बघत नाहीत, याची कुठलीही माहिती आम्हाला आमदार म्हणूनही दिली नाही. प्रशासनाला दिली नाही आणि कोणालाच देत नाहीत”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

“हे लपून ठेवतात, त्याचाच अर्थ हे गुन्हेगार आहेत. त्यांची कडक कारवाई करावी. पोलीस तपास चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे, भाजपचे आमदार आणि आता सध्या असलेले मंत्री, ज्यांचं महाराष्ट्रात गुन्हेगारांमध्ये वचक आहे, गुन्हेगारांमध्ये वावर आहे, त्यांचाही या प्रकरणात थोड्या दिवसांत हात दिसेल”, असा मोठा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला.