पुणे | 10 ऑक्टोबर 2023 : शेकडो कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेलाय. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांनी ललित पाटील याच्या भावाला अटक केलीय. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिवसेना नेते दादा भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. खरी माहिती समोर येईल, असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. ससून रुग्णालय प्रशासन ललित पाटील याला दाखल करण्यास नकार दिला होता, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे नमूद केलं की, एका आमदाराचा या प्रकरणात हात आहे. त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा सांगितलं की, शिंदे गटाच्या आमदाराचा यात हात आहे. याबाबतची माहिती सर्वांकडे आहे. नाही असं नाही”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“मी आता थेट माहिती घेते. मी नाव घेताना असं सांगतेय की, या सगळ्यात दादा भुसे यांच्या नावाच्या अवतीभोवती संशयाचं धूकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाही? दादा भुसे यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? गृह खात्याची याप्रकरणाचा खरंच छडा लावण्याची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा”, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलंय.
सुषमा अंधारे यांच्या आरोपांना मंत्री दादा भुसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “नाना पटोले मला ओळखतात. त्यांनी माझं थेट नाव घेतलेलं नाही. सुषमा अंधारे यांनी माझं नाव घेऊन थेट आरोप केलाय. त्यामुळे याप्रकरणी जगभरातील कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करायची असेल तर करा. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठलीही चौकशी लावा. मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे. माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत”, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.