सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Nov 09, 2023 | 2:57 PM

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे यांनी या ट्विटवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. संबंधित व्हिडीओ हा पोलिसांशी संबंधित आहे. या व्हिडीओवर इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या व्हिडीओवरुन सुषमा अंधारे यांच्यावरच निशाणा साधलाय.

सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, नेमकं काय घडतंय?
sushma andhare
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) एक व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओत पोलिसांची एक गाडी दिसत आहे. या गाडीत कैद्यांना काहीतरी पाकिटे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. सुषमा अंधारे यांनी या व्हिडीओवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोर्टातून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीत कैद्यांना पाकिटे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहकात्याची अब्रू चव्हाट्यावर आली”, असं म्हणत सुषमा अंधारे यांची फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. हा व्हिडिओ पुण्यातील जेल रोडचा आहे, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलंय.

“कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जनस्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये केलाय. सुषमा अंधारे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला या विषयावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस गृहखात संभाळण्यासाठी अपयशी ठरले आहेत. तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचं गृहखातं माझ्याकडे द्या”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

‘अब्रुनुकसानीचा दावा करणारे मंत्री गप्प का?’

“राज्याचे गृहमंत्री फक्त पक्ष फोडण्यात मग्न आहेत. गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी, तुम्ही नापास झाला आहात. गृह खात्याकडे फडणवीसांचं दुर्लक्ष झालंय. गृहखात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. तुमच्या अब्रूची लक्तरे पुन्हा एकदा महाराष्ट्रात टांगली गेली. आमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणारे मंत्री गप्प का? व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चेहरे देखील स्पष्ट दिसत आहेत. पाकीट नेमकी कसली दिली गेली?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

‘जेलमध्ये बसलेल्या बगलबचच्यांसाठी सुविधा’, नाना पटोलेंची टीका

सुषमा अंधारे यांच्या ट्विटवर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. “पोलीस पैसे घेत आहेत हे काय नवीन नाही. राज्याचं गृहखात काम करण्यासाठी कमी पडत आहे. यांची भाषण खोटी आणि आश्वासन देखील खोटीच”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. “सुषमा अंधारे यांनी काही नवीन ट्विट केलेलं नाही. जेलमध्ये बसलेल्या बगलबचच्यांसाठी सुविधा मिळत आहे. हे फक्त यरवडाबद्दल नाही. हे गुन्हेगार आणि माफिया यांना संरक्षण देणारं सरकार आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

सत्ताधारी पक्षाचे नेते ‘त्या’ व्हिडीओवर म्हणाले…

सुषमा अंधारे यांच्या ट्विटवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “मी तो व्हडिओ पाहिला नाही. त्यांनी तो पोलीस महासंचालक यांना द्यावा. ते त्यावर कारवाई करतील”, असं शंभूराज देसाई म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलंय. “काही लोकांची सवय आहे, मोठ्या लोकांवर बोलले की माणूस मोठा होतो म्हणून आरोप केले असतील”, अशी टीका बावनकुळे यांनी केली.