शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची निवड केली जात आहे. काही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागावाटप निश्चित करण्यात येत आहे. या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. विशेष म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत गेल्या काही दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. कारण या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर अजित पवार गटाचा दावा होता.
महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाची चर्चा झाली त्यावेळी अजित पवार यांनी या जागेवर दावा सांगितला. दुसरीकडे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे या जागेसाठी आग्रही होते. ते या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. त्यांची या मतदारसंघात ताकदही आहे. त्यामुळे शिवसेनेला ही जागा मिळावी, अशी त्यांची मागणी होती. पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आढळराव पाटील यांनी घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढण्यासाठी अनुमती दर्शवली. यासाठी पडद्यामागे जोरदार हालाचाली घडल्या.
दरम्यान, आढळराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी होतील, अशी चर्चा सुरु होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. आढळराव पाटील यांचा आज अजित पवार गटात प्रवेश झाला आहे.