पुणे : हिंजवडी (Hinjewadi) ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) सरपंचपदाची (Sarpanch) निवडणूक नुकतीच पार पडली. यात शिवनाथ दिगंबर जांभुळकर पाटील यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे ते सरपंचपदी बिनविरोध निवडून आले आहेत. विशाल साखरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. शिवनाथ जांभुळकर यांचा सरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नायकवडी यांनी याबाबतची घोषणा केली. विरोधी गटाच्या दोन्ही सदस्यांनी या सभेला बहिष्कार टाकल्याने ग्रामपंचायतीचे 17 पैकी 15 सदस्य उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर व गावकामगार तलाठी सागर शेलार यांनी कामकाज पाहिले. आता सरपंचपदी शिवनाथ जांभुळकर तर उपसरपंचपदी शुभांगी साखरे काम पाहतील.
सरपंच आणि उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी सत्कार केला. शिवाजी महाराज चौकातील श्री गणेश व म्हातोबा टेकडी वरील श्री म्हातोबा महाराजांचे सर्वांनी सामूहिक दर्शन घेतले. यावेळी आयटी नगरी आणि गावातील समस्या तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान असून सर्वांनी हे प्रश्न सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
माजी नगरसेवक संजय नेवाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे, संतोष साखरे, वसंत साखरे, शामराव हुलावळे, तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, अॅड. शिवाजी जांभुळकर, सुहास दगडे, शिवाजी बुचडे, सुरेश हुलावळे, मल्हारी साखरे, प्रवीण जांभूळकर, हभप सुखलाल महाराज बुचडे यांच्यासह ग्रामस्थ या सभेला उपस्थित होते.