महाविकास आघाडीत बिघाडी, …तर अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होईल, काँग्रेस नेत्यानेच केली टीका

| Updated on: Jun 20, 2023 | 4:08 PM

maha vikas aghadi : महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही. मनिषा कायंदे ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. त्यानंतर ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला हवे आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी, ...तर अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होईल, काँग्रेस नेत्यानेच केली टीका
amol mitkari and sanjay raut
Follow us on

सागर सुरवसे, सोलापूर : विधान परिषदेतील समीकरणे पुन्हा बदलणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एक आमदार कमी झाल्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. ज्याची संख्या जास्त त्यांनी पद, ही सूत्र असल्याचे म्हटले आहे. ठाकरे गटातून मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्या आहेत. त्याचा परिणाम मविआमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली. त्यावरुन काँग्रेसने अमोल मिटकरी यांच्यांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसची मिटकरी यांच्यांवर टीका

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अन् शिवसेना ठाकरे गट असे महाविकास आघाडीतील तीन पक्ष आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत रोज सकाळी माध्यमांशी संवाद साधतात. विविध विषयांवर बोलताना ते महाविकास आघाडीतील पक्षांवर मत मांडतात. आता अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात वक्तव्य केले. त्यानंतर काँग्रेसने त्यांना घेरले. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची मिटकरींवर टीका केली. ते म्हणाले की. अमोल मिटकरी यांच्या अशा वक्तव्यामुळेचा त्यांचेही संजय राऊत होईल. विरोधी पक्ष नेता कोण असेल? याचा निर्णय संख्याबळावर होतं असतो.

विधान परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे नऊ, नऊ जागा होत्या. मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागा कमी झाल्या. परंतु यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यामध्ये इतरांनी लुडबुड करु नये. अमोल मिटकरी यांनी आता कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यांच्यात उद्याचा संजय राऊत मला आज दिसतोय. मिटकरी यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबलं तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचत होतील अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

आता फडणवीस यांचा सर्व्हे

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने स्वतःच स्वतःचा सर्व्हे केला. त्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मोठे आहोत हे सांगणारी जाहिरात प्रसिद्ध केली. आता देवेंद्र फडणवीस सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजे लगीन लोकांचं आणि नाचतय येड्या डोक्याचं ही म्हण या दोघांना लागू होते, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी लगावला. तू मोठा की मी मोठा ही स्पर्धा महाराष्ट्रच्या विकासासाठी अतिशय घातक आहे. सरकार येऊन जवळपास 11 ते 12 महिने झाले आणि राज्यातील जवळपास 12 उद्योग दुसरीकडे गेले आहेत, पण या दोघांना महाराष्ट्राच्या विकासाचे काहीही देणे घेणे नाही,असा आरोप त्यांनी केला.

एसटीचे विलनीकरणाचा विसर

एसटी विलनीकरण, मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. पण ते आता विसरले आहेत. पुढच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी पक्षतील, विरोधी पक्षातील अडथळे दूर करण्याचे काम भाजप करत आहे. राज्यातील18 मंत्री निष्क्रिय असून पाच मंत्री बदलले जातील अशा चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहेत. या निष्क्रिय लोकांवर चादर घालण्याचे काम करून केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून होत असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटलेय.