पुणे : पुणे विभागात एसटीची (ST) सेवा पूर्ववत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जिल्ह्यातील वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत 1 हजार 892 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर अजूनही 2 हजार 300 कर्मचारी संपात सहभागी आहेत. मात्र हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. विभागातील 11 डेपोतून गाड्या सुरळीत सुरू झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने (High Court) एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरू होण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली होती. संपामुळे गेले 5 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशालाही काही कर्मचारी जुमानत नसल्याचे दिसत आहे. पुणे विभागात आतापर्यंत 1 हजार 892 कर्मचारी जरी कामावर हजर झाले असले तरी अजूनही 2 हजार 300 कर्मचारी संपात सहभागी आहेत. या आडमुठ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांना कामावर परतणे बंधनकारक आहे. मात्र ते अद्याप कामावर परतले नसल्याने त्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.