पुणे : राज्य महामार्ग पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune Mumbai expressway) चार इंटरसेप्टर्स लावून ‘वाहनांचा वेग’ तपासण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणांतर्गत, सविस्तर अभ्यास केला जाईल आणि महामार्ग पोलिसांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड यांना अहवाल सादर केला जाईल. माजी आमदार आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या 14 ऑगस्ट रोजी झालेल्या मृत्यूमुळे द्रुतगती महामार्गावरील वाढत्या रस्ते अपघातांचा (Accidents) प्रश्न ऐरणीवर आला. मागील काही काळापासून अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य महामार्ग पोलिसांनी सर्वेक्षण हाती घेतले आहे. हे सर्वेक्षण 15 दिवस चालणार असून चालकांचे वर्तन, लेन कटिंगची कामे कारणे आणि वेग याविषयी सविस्तर अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महामार्गाचे संचालन करणार्या MSRDC आणि IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड यांना सूचना आणि शिफारशींसह अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे हायवे स्टेट पोलीस (HSP) वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याची विनंती करत सांगितले. पायाभूत सुविधांच्या कामांसाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या एका भागावर शुक्रवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक ठेवण्यात आला होता. हे काम साधारणपणे अडीच तास चालले. त्यानंतर तीनही लेन सुरू करण्यात आल्या, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
MSRDCच्या प्रसिद्धीनुसार, पुण्याजवळील किवळे गावाजवळ ओव्हरहेड गॅन्ट्री (सपोर्ट म्हणून वापरलेली मेटल फ्रेम) उभारण्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक चालवला गेला. किवळे ते तळेगाव टोलनाका दरम्यानची वाहतूक सोमाटणे मार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात आली होती. प्रवासादरम्यान आपत्कालीन मदतीसाठी वाहनचालक एक्स्प्रेसवे हेल्पलाइन नंबर 9822498224 किंवा हायवे पोलीस हेल्पलाइन नंबर 9833498334 डायल करू शकतात, असे आवाहनही करण्यात आले होते. दरम्यान, सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर अनेक बदल महामार्गावर करण्यात येणार असून प्रवाशांच्यास सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे.