पवार यांची पॉवर असलेल्या राष्ट्रवादीत दीड वर्षांपूर्वी बंड झाले होते. पवार कुटुंबातच राष्ट्रवादीची विभागणी झाली होती. अजित पवार आणि शरद पवार अशा दोन गटात राष्ट्रवादी विभागली गेली होती. पक्ष फुटीपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांना थांबण्याचा सल्ला देत नवीन लोकांकडे पक्ष देण्याची मागणी केली होती. आता अजित पवार यांच्या सुरात सूर आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मिळवले आहे. त्यांनीही पक्षाची जबाबदारी नवीन युवा आमदारांवर दिली पाहिजे. त्यामुळे पक्ष पुन्हा उभारी घेईल, असे वक्तव्य केले आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुनंदा पवार म्हणाल्या, ही भेट कौटुंबिक होती. पवार साहेबांचा हा ८५ वा वाढदिवस होता. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार आणि सुनेत्रा पवार आले होते. दरवर्षी आम्ही त्यांना भेटत असतो. त्याला राजकीय अर्थाने पाहू नये.
विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर अजित पवार यांनी ही भेट घेतली. त्यावर बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, अजित पवार यांची कोणतीही गोष्ट बातमी होते. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? याबाबत काहीच सांगता येत नाही. परंतु प्रत्येक कुटुंबात मतभेद असतात. परंतु दोघांनी एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे.
शरद पवार यांनी सत्तेसोबत जावे की नाही? हा निर्णय त्यांचा आहे. कारण त्यांनी ६० वर्षे राजकारणात काढली आहे. त्यांना त्याचा मोठा अनुभव आहे. दोघांनी एकत्र यावे, हा त्या दोघांचा निर्णय असणार आहे, असे सुनंदा पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळावी का? त्यावर सुनंदा पवार म्हणाल्या, रोहित पवारच नव्हे तर पक्षात नवीन विचार आणि युवकांना संधी दिला पाहिजे. रोहित एकटाच नाही तर त्याच्याबरोबर अनेक युवा आमदार त्याच्यासोबत निवडून आले आहेत. त्यांच्यावर जबाबदारी दिली तर पक्ष पुन्हा उभा राहू शकतो.