रणजित जाधव, पिंपरी-चिंचवड, पुणे, दि. 21 फेब्रुवारी 2024 | लोकसभेच्या निवडणुका महिन्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे राहणार आहे. बारामतीत पवार कुटुंबियांमध्ये लढत होणारा असल्याचे स्पष्ट संकेत दोन्ही गटाने दिले आहे. लोकसभेत सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे लढत रंगणार असल्याचे सध्या दिसत आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटालाच आहे तर महायुतीत अजित पवार यांच्या गटाला ही जागा देण्यात येणार आहे. या लढतीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी शरद पवार गटाची रणनीती सांगितली.
बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळे बारामतीत खरी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा अशी होणार आहे. यामुळे प्रचारात आम्ही अजित दादांविरोधात बोलू.
अजित पवार यांना शिरुरची जागा मिळणार नाही, असा दावा रोहित पवार यांनी केला. ते म्हणाले, शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांना पाडणार असे अजित पवार म्हणतात. या मतदार संघात अमोल कोल्हे विरोधात पार्थ पवार ही असू शकतात. परंतु अजितदादांना महायुतीत चारच जागा मिळणार आहेत. त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही.
बारामतीची जागा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच लढवणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले. अजित पवार म्हणाले की, विधानसभा मतदारसंघात महायुती म्हणून बैठक घ्या. भाजप , शिंदे गट , अजित पवार गटाची एकत्रित बैठक घेवून काम करा. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बुथ यंत्रणा, मतदार याद्यावर काम करा, अशा सूचना कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी केल्या.
हर्षवर्धन पाटलांच्या मुलीने जो आमच विधानसभेला काम करेल आम्ही त्याच्या विरोधात लोकसभेला काम करणार अस म्हटले होते. मात्र इंदापुरात अजीत पवार गटाचा आमदार आहे. यामुळे या ठिकाणी रविवारी अजित पवार गटाचा मेळावा होणार आहे. त्यात अजित पवार काय बोलणार याची उत्सुकता आहे.
हे ही वाचा
बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा… नणंद भावजयचे प्रचार रथ अन्…