मावळ, पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू न देणे हे भाजपाचा पूर्वनियोजित कट होता, तो त्यांनी यशस्वी केला, असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला आहे. काल देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचा सोहळा पार पडला. त्यानंतर झालेल्या सभेदरम्यान पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करू देण्यात आले नाही. त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या मतदारसंघात देहूगाव (Dehu) आहे. मात्र तरी त्यांना सामान्यांप्रमाणे आमंत्रण केले गेले होते. म्हणून ते आधीपासूनच नाराज होते. त्याच भाजपाच्या या भूमिकेची भर पडली आहे. यावरून राष्ट्रवादीने भाजपावर निशाणा साधला आहे. कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.
सुनील शेळके म्हणाले, की कार्यक्रमाचा प्रोटोकॉल पाहिला, तर खासदार, आमदार, महापौर यांना कार्यक्रमस्थळी बोलवायला पाहिजे होते. यासंबंधीची जबाबदारी देहू संस्थान किंवा पीएमओ ऑफिसने आमच्याकडे दिली नाही. बहिष्कार कार्यक्रमावर नसून कार्यक्रमाची जी व्यवस्था करण्यात आली होती, यावर नाराजी असल्याचे ते म्हणाले. हा कार्यक्रम भाजपाचा होता. नियमाप्रमाणे आम्हाला निमंत्रण न देता केवळ कार्यकर्त्याप्रमाणे बोलावण्यात आले. जिथे पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी आम्ही असायला हवे होतो, त्याठिकाणचे निमंत्रण आम्हाला नव्हते. विशेष म्हणजे आम्हाला मंदिरातही प्रवेश नव्हता.
मंदिरातील कार्यक्रमात केवळ संस्थानची काही मंडळी आणि भाजपाचे लोक होते. व्यासपीठावरदेखील स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्षा यांना जागा दिली गेली नाही. भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचा बेताल वक्तव्ये करणाऱ्या कोणीतरी तुषार भोसले नावाच्या व्यक्तीला व्यासपीठावर स्थान देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना स्थान देण्यात आले, मात्र स्थानिक नेत्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे तो कार्यक्रम केवळ भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचा होता, भाजपा पुरस्कृत होता, असा आरोप शेळके यांनी केला.