पुरंदर, पुणे : सत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली आहे. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. गणेशोत्सवात गणेश मंडळांना मुख्यमंत्री भेट देत होते. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पण जावे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला आहे. तर राज्याला दोन मुख्यमंत्री हवेत, एक गणपती दर्शनासाठी आणि दुसरे मंत्रालयात बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. दरम्यान, पुरंदर येथील राजेवाडी याठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्वरीत पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी (Farmers) केली आहे.
निर्मला सीतारामण आल्यावर बारामती मतदारसंघासाठी 5 ते 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची आम्ही मागणी करणार आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. देशाच्या एवढ्या मोठ्या बजेटमध्ये हजार-दोन हजार कोटी काही मोठी रक्कम नाही. नुकसान प्रचंड झाले आहे, त्यामुळे ती मदत त्यांनी करावी. सुदैवाने सीतारामण या बारामतीला येणार आहेत. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, त्यामुळे जितके पक्ष येतील त्या सर्वांचे आम्ही स्वागतच करू, असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही कुठले शहनशाह? मायबाप जनता हीच शहनशाह, असे प्रत्युत्तर त्यांनी भाजपाला दिले आहे. शरद पवार हे केवळ साडे तीन जिल्ह्यांचे शहनशाह असल्याची टीका भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यावर त्यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा हा राजा आहे आम्ही तर साधे रंक आहोत.
पुरंदरला विमानतळ करण्यास स्थानिकांचा विरोध नाही. केवळ जागेसंदर्भात काही वेगळी मते आहेत. मात्र अशा संवेदनशील मुद्द्यांवर सर्वांशी चर्चा करायला हवी. मार्ग नक्कीच निघतो. त्यामुळे यात काही अडचणी येतील, असे मला वाटत नाही, असे सुळे म्हणाल्या.