अभिजित पोते, पुणे, दि. 7 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या. पुणे शहरात शरद मोहोळ याचा झालेला खून आणि भाजप आमदार सुनील कांबळे याने पोलिसांना केलेल्या मारहाणीवरुन त्यांनी टीकेची झोड उठवली. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. त्यांना दोन पदांचा कार्यभार पेलवला जात नाही. ते राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या पोलिसांवर हल्ला झाला आहे. त्यांनी सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पुण्यात महिला भेटतात आणि म्हणतात आम्हाला कोयता गँगची भीती वाटते. आमचे सरकार असताना पुण्यात कुठे होती कोयता गँग, आता ही कशी तयार झाली, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस आता टीव्हीवर दिसत नाहीत. दादा दिसतात, मुख्यमंत्री तर रोजच दिसतात. पण आधीसारखे देवेंद्र फडणवीस दिसत नाहीत, अशा चिमटा घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे पटो न पटो आधी ५ वर्ष देवेंद्र फडणवीस नेहमी मुख्यमंत्री म्हणून टीव्हीवर दिसत होते. आता मात्र ते दिसत नाहीत. कधीतरी नागपूर विमानतळावर दिसतात. एकच प्रश्न घेतात आणि नमस्कार करून निघून जातात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झालाच आहे. वर्गात पाहिले आले आणि तुम्ही त्यांना मागे बसवले. मुख्यमंत्रीवरून त्यांना हाफ मुख्यमंत्री केले, असा टोला त्यांनी लगावला. सत्तेत असलेली व्यक्ती एका पोलिसाला आणि त्यांच्याच मित्र पक्ष असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करतो आणि मारहाण करतो, हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे नाही, अशी टीका त्यांनी केली.
अजित पवार गटाच्या बॅनर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. या बॅनरवर नवाब मलिक यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता काय करायचं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारा? मित्र पक्षाचा मान सन्मान फडणवीस यांनी करायला हवा होता.
दिल्लीत जशी दडपशाही आहे तशीच महाराष्ट्र राज्यात देखील दडपशाही सुरू आहे. महाराष्ट्रात निवडणूक होतच नाही. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही. एक माणूस प्रशासक म्हणून शहर कसे बघणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे करोडो रुपयांचा चुराडा आहे. शासन आपल्या दारी म्हणजे सरकारने सुरू केलेला नागरिकांचा उलटा प्रवास आहे.