सुप्रिया सुळेंचा दरेकरांच्या विधानावर बोलण्यास नकार, म्हणाल्या; माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार

| Updated on: Sep 14, 2021 | 1:36 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलण्यास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नकार दिला आहे. (supriya sule)

सुप्रिया सुळेंचा दरेकरांच्या विधानावर बोलण्यास नकार, म्हणाल्या; माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार
supriya sule
Follow us on

पुणे: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलण्यास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नकार दिला आहे. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. (supriya sule no comments on pravin darekar controversial statement)

सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केलं. प्रविण दरेकर यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर, मी याविषयी काहीही बोलणार नाही. माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

आरोपीला फाशीच हवी

यावेळी त्यांनी साकीनाका दुर्घटनेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. साकीनाका येथील घटना अत्यंत दुर्देवी व वाईट आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आमच्या सर्वांची हीच मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पोलिसांना व संबंधित खात्याला आदेश दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मी आभारी आहे, असं त्या म्हणाल्या.

सोमय्यांचे आरोप गंभीर नाही

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोप गंभीर नाहीत असे मला वाटते. मंत्री मुश्रीफ यांनी याच्यावरती स्वतः स्पष्टीकरण दिलेले आहे, असं सांगतानाच राज्यासमोर आणि देशासमोर अतिशय गंभीर विषय आहेत. त्यामुळे लोकांची दिशाभूल करणे मला योग्य वाटत नाही, असं त्या म्हणाल्या.

दरेकर काय म्हणाले होते?

प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.

चाकणकरांचा हल्लाबोल

दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. प्रविणजी दरेकर, तुम्ही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहात. हे सभागृह वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. परंतु आपण आज ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं यावरून तुमचा वैचारिकतेशी अभ्यासाशी काहीही संबंध नसल्याचं दिसून येतं. तुम्ही जे वक्तव्य केलं ते उच्चारताना मला लाज आणि संकोच वाटतो. पण घेणं नाईलाज आहे. तुम्ही म्हणालात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे. तुम्ही महिलांबद्दल असं बोलत आहात. सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकते. त्यातून तुमच्या वैचारिक दारिद्रय दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलं. तुमच्या पक्षातील काही महिला आम्ही महिलांच्या किती कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आज मला त्यांची कीव वाटते. ज्या पक्षाचा असला विचार आहे, अशा पक्षात या महिला काम करत आहेत. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृतीही दिसून येते. प्रविणजी दरेकर, तुम्ही या विधानबद्दल माफी मागावी. नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाडही रंगवू शकतो, याची जाणीव ठेवावी, असा इशारा चाकणकर यांन दिला आहे. (supriya sule no comments on pravin darekar controversial statement)

 

संबंधित बातम्या:

चाकणकर म्हणाल्या, गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू, दरेकर म्हणतात, गाल सर्वांनाच रंगवता येतात

दरेकर माफी मागा नाही तर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू: रुपाली चाकणकर

मोठी बातमी: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला

(supriya sule no comments on pravin darekar controversial statement)