अभिजित पोटे, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यात चित्रकार रुचिरा विनय मणियार यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यशक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांच्या हस्तेच प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, संगीतकार अजय अतुल इतर अन्य मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
विशिषे म्हणजे या कार्यक्रमाला पवार कुटुंबियांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, रोहीत पवारांच्या आई सुमित्रा पवार तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांचं कौतुक केलं.
“हातामध्ये, मनामध्ये कला असते. पण त्याला मार्केट मिळत नाही. पवार साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. त्याचं उदाहरण मीच आहे. मला पवारांनी हात लावला आणि मी मोठा झालो”, अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं.
शरद पवार यांनीदेखील यावेळी आपले जुने किस्से सांगितले.
“इथे माझे अनेक मित्र आहेत. आम्ही पुण्यात एकत्र शिकलो. आमच्या क्षेत्रात वेगळं करणारे आम्ही मित्र होतो. श्रीमती गांधी यांनी माझी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. आणि आम्ही नवीन पक्ष काढण्याचं निर्णय घेतला. पहिल्यांदा निवडणुका आल्या आणि तिकिट वाटपावेळी साताऱ्यासाठी मला श्रीनिवास पाटील यांचं नाव आठवलं. मध्यंतरी त्यांना आम्हाला तिकिट देता आलं नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी सुनेचं तोंडभरून कौतुक केला. “माझ्या सुनेचा सत्कार आज केला, याचा मला मनापासून आनंद होत आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.