सोलापूर | 17 सप्टेंबर 2023 : गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे राजकारणात फारसे अॅक्टिव्ह दिसले नाहीत. काँग्रेसच्या कार्यक्रमांना शिंदे आवर्जुन हजेरी लावायचे. पण पाहिजे तसे सक्रिय दिसले नाहीत. शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर पक्षानेही त्यांच्यावर नवी कोणतीही मोठी जबाबदारी दिली नाही. आता तर सुशीलकुमार शिंदे हे निवडणुकांच्या राजकारणातून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. तसे संकेतच त्यांनी दिले आहे. सोलापुरातून पुढील निवडणूक कोण लढणार याची घोषणाच सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीला सुशीलकुमार शिंदे यांनी पसंती दिली आहे. मला तर वाटतं प्रणिती कॉम्पिटेंट आहे. ती तिन्ही लँग्वेजमध्ये पावरफूल आहेत. अधिवेशनातही ती चांगली बोलते. त्याचा इफेक्ट देशावरही पडतो. प्रणिती शिंदे लोकसभेसाठी सक्षम आहेत. मात्र उमेदवारीचा निर्णय हायकमांड करतील. आम्ही तर सांगणार आहोत प्रणिती ताईंना उमेदवारी देऊन टाका, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या या विधानातून ते यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर प्रणिती शिंदे आता राष्ट्रीय राजकारणात दिसतील असे संकेतही मिळत आहेत.
केंद्र सरकारने इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा वापर सुरू केला आहे. त्यावरून सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपवर हल्ला चढवला. इंडिया नावाबाबत या अधिवेशनात काही करतील असे वाटत नाही. इंडिया नाव बदलण्याबाबत भरपूर कॉम्प्लीकेशन आहेत. देशाचे नाव इंडिया आहे, तेच राहिले पाहिजे. विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमुळे केंद्रातील भाजप सरकार घाबरले आहे. म्हणूनच त्यांच्याकडून इंडिया या शब्दाचा वापर टाळला जात आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.
संभाजीनगरात काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मोठा खर्च करण्यात आला. त्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. आताच आम्ही सांगितले आहे, वायफळ खर्च करू नका. त्या ऐवजी एखाद्या सामाजिक उपक्रमाला मदत करा. महाराष्ट्र सरकारने फिजूल खर्च करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणावरही त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे या मताचा मी आहे. ओबीसी समाजासंदर्भात एकत्र बसून प्रश्न सोडवला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.