एक आई, बहीण, मुलगी आणि शिक्षिका म्हणून सांगते, शंभुराज देसाईंच्या धमक्यांना… सुषमा अंधारे कडाडल्या

| Updated on: May 30, 2024 | 8:44 PM

पुण्यात झालेल्या हिट अँड रनच्या प्रकरणानंतर मंत्री शंभुराज देसाई आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. शंभुराज देसाई यांनी तर सुषमा अंधारे यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे. त्याला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एक आई, बहीण, मुलगी आणि शिक्षिका म्हणून सांगते, शंभुराज देसाईंच्या धमक्यांना... सुषमा अंधारे कडाडल्या
sushma andhare
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात चांगलंच वाजलं आहे. या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी थेट देसाई यांच्या अख्त्यारीत येणाऱ्या एक्साईज विभागावरच बोट ठेवलं. अंधारे यांनी या प्रकरणावरून शंभुराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दाव ठोकण्याचा इशारा दिला आहे. नुसते हवेत आरोप करू नका. पुरावे द्या. नाही तर तुमच्यावर दावा ठोकेल, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.

एक्ससाईज खात्याबद्दल तर न बोलले बरं, मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे 40 लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत. विशेषत: शंभूराज देसाई यांनी एक्ससाईज खातं संभाळलं असेल, तेव्हापासून नाशिक, संभाजीनगर किंवा पुणे परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रग्सचे साठे सापडत आहेत. यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

देसाई यांना ज्ञात नसेल

ही एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत बसतात. खर म्हणलं तर ज्यांनी तंबाखू, गुटखा याला पायबंद घालण्यासाठीचे काम केले पाहिजे, ते स्वतः सभागृहात तंबाखू सोडत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर नुकसानीचा दावा टाकेल मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात. मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांनी जे विचारले त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधील असतात हे शंभूराजेंना कदाचित ज्ञात नसेल, असा टोलाच सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

खात्याची झालेली नाचक्की पाहा

हुकूमशाही व्यवस्थेमध्ये वावरल्यासारखं ते जेव्हा याच्या त्याच्यावर केस ठोकेल म्हणतात त्यावेळेला मला त्यांना एवढेच सांगायचं आहे की, आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्सचे साठे, ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब, बार आणि कुठले व्यवहार या सगळ्यांनी खात्याची अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे, ती कशी सांभाळता येईल ते बघा, असं अंधारे यांनी म्हटलं.

तुमच्या धमक्यांना भीक घालणार नाही

राहिला प्रश्न आमच्यावर दावे ठोकायचा, असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकाल असं तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा एकदा पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन सांगते, जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलिकडे जाऊन, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना आणि केसेस, धमक्याना भीक न घालता माझी लढाई चालू ठेवणार आहे, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.