विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 नोव्हेंबर 2023 : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सुषमा अंधारे यांनी माझं नाव घेतलं होतं. माझी नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली होती. पाटणा तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आम्ही या प्रकरणी कोर्टात तक्रार दाखल केली आहे. अंधारे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असं राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. त्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका वाक्यातच सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शंभूराज देसाई तक्रार करत असतील तर मी त्याचं स्वागत करते. चांगली गोष्ट आहे. असं दबावतंत्र वापरून घाबरू शकत असतील तर मी फेस करायला तयार आहे. ललित पाटील प्रकरणी ससून डीनची नार्को टेस्ट करा सगळं पुढे येईल. लाखोंचे ड्रग्ज विक्री होते, मग कायदा सुव्यवस्था आहे का? याबाबत गृहमंत्र्यांना मी प्रश्न विचारत आहे. शंभूराजे वेळ, तारीख सांगा मी लढायला तयार आहे, असं आव्हानच सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.
यावेळी त्यांनी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सदावर्ते हे फडणवीस यांना श्रद्धेय मानतात. मग सदावर्ते यांच्याकडे आता 216 पानी याचिका दाखल केलीय, मराठा आंदोलन दरम्यान घटना घडल्या त्याबाबतची सगळी माहिती जमा केली म्हणून प्रश्न निर्माण होतो की हा डाटा कुठून येतो? नक्कीच गृहमंत्री पुरवत नसतील. तर ही माहिती आली कुठून? मग कोणाला पुरस्कृत राहून काम करतात,दोन दिवसात एवढी माहिती आली कुठून?, असा सवाल अंधारे यांनी केला.
ललित पाटील ड्रग्ज केस प्रकरणात सुषमा अंधारे यांनी माझ नाव घेतले होते. त्यांनी माझी नार्को टेस्ट करण्याची मागणीही केली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पाटण न्यायालयात रीतसर बदनामीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांच्यावर कडक कारवाईची मागणी आम्ही न्यायालयाला करणार आहोत, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं.