प्रदीप कापसे, पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभे केले होते. त्यांनी दोन वेळा उपोषण केले. त्यानंतर २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन सरकारतर्फे त्यांना देण्यात आले आहे. मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या सर्वांना ओबीसीमधून आरक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातील कुणबी नोंदी तपासण्याचे कामे वेगाने सुरु आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षकांना या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत. ११ नोव्हेंबरपर्यंत १९६७ पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या कुणबी, मराठा नोंदी शोधण्याचे आदेश सरकारने दिले आहे. कुणबी नोंदीची माहिती शोधून स्कॅन करुन उद्यापर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. त्यांना दिवाळीत कामे करावी लागणार आहे.
कुणबी नोंदी तपासण्याची कामे ११ नोव्हेंबरपर्यंत झाले नाही तर शिक्षकांची दिवाळी सुट्टी रद्द होणार आहे. वेळेत काम झाले नाही तर सुट्टीच्या काळात शिक्षकांना ही कामे करावे लागणार आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यामुळे शिक्षकांची यंदाची दिवाळी शाळेतच जाणार की काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत सांगली जिल्ह्यात 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत 2 हजारांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यानी दिली.जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कुणबी जातीच्या 5 हजार 601नोंदी सापडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तहसील विभागाच्या वतीने जुन्या कुणबी जातीच्या नोंद शोधण्याची मोहीम सुरू आहे. एकूण 56 हजार 674 कागदपत्रांची तपासणी मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात 20,003 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पाटण तालुक्यात सर्वाधिक नोंदी मिळाल्या आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. सातारा तालुका 1800, माण तालुका-9, खटाव तालुका- 208, पाटण तालुका- 14000, कोरेगाव तालुका 1032, महाबळेश्वर तालुका 1100, खंडाळा तालुका 854, वाई तालुका170, फलटण तालुका 18 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.