अभिजित पोते, पुणे | 7 डिसेंबर 2023 : राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तुपे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. आता अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तुकाराम सुपे यांनी तीन कोटी ५९ लाख ९९ हजार रुपयांच्या संपत्तीप्रकरणी कोणताही खुलासा करु शकले नाही. त्यांनी हे पैसे भ्रष्टाचारातून कमावले असल्याचा आरोप आहे. हे पैसे १९८६ पासून ते २५ डिसेंबर २०२१ दरम्यान कमावले आहे. त्यांच्याकडे ही रक्कम आली कुठून याची चौकशी सुरु आहे. आता राज्यातील आठ बडे अधिकारी चौकशीच्या रडारवर आले आहे.
तुकाराम सुपे यांच्याकडे एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया सापडली. त्यांच्या घरातून दोन कोटी ८७ लाख ९९ हजार रोख रक्कम मिळाली होती. तसेच १४५ तोळे सोन्याचे दागिने मिळाले होते. शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून लाच घेऊन त्यांचा पास केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे तुकाराम सुपे यांच्यासह राज्यभरातील 3 बड्या शिक्षण अधिकाऱ्यांवर अपसंपदा मालमत्ता प्रकरणी पुणे लालूचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्य परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे उत्पनापेक्षा पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६८३ रुपयांची अपसंपदा मिळाली. तसेच सांगली येथील निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे यांच्याकडे ८३ लाख ९१ हजार ९५२ रुपये मिळाले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम सुपे यांच्या पत्नीच्या नावावर जमीन आहे. त्यांच्या अन्य मालमत्तेची चौकशी सुरु आहे, असे एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.
पुणे ACB कडून करण्यात राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. बुधवारी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ॲक्शन मोडवर आलेले आहे. आता पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून राज्यातील 8 बड्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे.