पुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तरे द्या आणि कायद्याची लढाई कायद्यानेच लढा. किरीट सोमय्या यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी एक दगड मारला तरी महागात पडेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला. पाटील आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (The battle of law must be fought by law, Chandrakant Patil’s warning to Hasan Mushrif)
पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाला त्यांनी उत्तर दिले पाहिजे आणि कायद्याची लढाई कायद्याने लढावी. ती चपलेने लढू नये. कारखान्यामध्ये 98 कोटी रुपये ज्या कंपन्यातून आले त्या कंपन्या कोठे आहेत आणि कोलकत्याच्या कंपन्यांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यात गुंतवणूक कशी केली यावर बोलावे. मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या पहिल्या आरोपांवर अजून उत्तर दिलेले नाही, दुसऱ्या आरोपांबाबत मूळ विषयाबद्दल बोलावे. लवकरच तिसरा आरोप होणार आहे.
पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या हे कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास येणार होते, तर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली, ही हुकूमशाही आहे. याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल. भाजपाच्या रडारवर केवळ शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आहे हा आरोप चुकीचा आहे. लवकरच काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढली जातील. भाजपाच्या रडारवर कोणी पक्ष नव्हे तर भ्रष्टाचार, अन्याय आणि महिलांवरील अत्याचार आहे.
भाजपची ऑफर नाकारली म्हणून आरोप होतात, हे हसन मुश्रीफ यांचे म्हणणे पाटलांनी खोडून काढले. मुश्रीफ यांना भाजपाने कधीही ऑफर दिली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपा राज्यसभेची पोटनिवडणूक लढवणार असून पक्षातर्फे मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय उमेदवार असतील. 22 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल व आपण स्वतः त्यावेळी उपस्थित राहणार आहोत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
इतर बातम्या
किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या फैरी, अजित पवारांनी एका वाक्यात निकाल लावला!
आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा
(The battle of law must be fought by law, Chandrakant Patil’s warning to Hasan Mushrif)