पिंपरी चिंचवड : सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत (Bullock cart race) पिंपरी-चिंचवडमध्ये संपन्न होत आहे. आज पहाटे सहा वाजल्यापासूनच याची सुरुवात झाली आहे. खरे तर ही स्पर्धा उद्यापासून सुरू होणार होती. मात्र बैलगाडा मालकांनी घेतलेला सहभाग पाहून ही स्पर्धा एक दिवस अगोदर सुरू करण्यात आली. या शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी बैलगाडा मालकांनी अभूतपूर्व सहभाग नोंदवला. याचे व्हिडिओ (Video) सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. यात सहभागी स्पर्धक तसेच एकूच उत्साह या स्पर्धेच्या निमित्ताने दिसून येत आहे. तर मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालक स्पर्धेत सहभागी झाल्याने स्पर्धेचे नियोजन अचूक करता यावे, यावर भर देण्यात येत आहे. आज पहाटे सहा वाजता म्हणजेच नियोजित वेळेपेक्षा एकदिवस आधीच स्पर्धेचे अनौपचारिक उद्घाटन (Inauguration) करण्यात आले.
पिंपरी चिंचवडच्या चिखलीमध्ये आयोजित बैलगाडा शर्यत त्यात दिल्या जाणाऱ्या बक्षिसांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून या स्पर्धेसाठी राज्यभरातून 2 हजारांहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन घेतल्याने ही स्पर्धा एक दिवस आधी म्हणजे आजपासूनच सुरू करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन 28 मे ला म्हणजेच उद्या प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, भाजपाचे अनेक मोठे नेते या बैलगाडा शर्यतीला हजेरी लावणार आहेत.
स्पर्धा आज सुरू झाली असली तरी उद्घाटन आणि इतर कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. या स्पर्धेत जेसीबी, बोलेरो, 101 दुचाकी अशी बक्षिस असल्याने स्पर्धेची चांगलीच चर्चा झाली आहे. त्यामुळे स्पर्धेला प्रतिसाद ही प्रचंड मिळाल्याने स्पर्धा एक दिवस आधीच सुरू झाली आहे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेली परवानगी जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. सर्वात मोठी बैलगाडा शर्यत अशी जाहिरातबाजी आयोजकांकडून करण्यात आली होती.
– 28 मे शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये बैलगाडा शर्यत होणार आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
– 29 मे रविवार आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत.
– 30 मे सोमवार भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि कामगार नेते नरेंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत.
– 31 मे मंगळवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.