पिंपरी चिंचवड : मुलांच्या भांडणात जाण्यास विरोध करणाऱ्या आईवर एका मुलाने कोयत्याने वार (Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार चाकणमध्ये घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुलाच्या भांडणात जाण्यास आईने विरोध केला होता. त्या कारणावरून मुलाने आईवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले आहेत. ही घटना रविवारी (1 मे) रात्री पावणेनऊ वाजता राक्षेवाडी, चाकण (Chakan) येथे घडली. तर राहुल जाधव (वय 28, रा. राक्षेवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी जखमी आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांचा मुलगा आहे. त्याला फिर्यादी यांनी पैसे कमी दिले; तसेच आरोपी मुलाने केलेल्या भांडणात जाण्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला.
आरोपी राहुल जाधव याने या दोन्ही कारणांवरून आईवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले आहेत. या हल्ल्यात आई जखमी झाली आहे. संबंधित महिलेस घटना घडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुलगा राहुल जाधव याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून कोयत्याने वार करण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोयत्याने वार करण्याची आधीही घटना घडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्लाची सुपारी देणारे आणि हल्ला करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे त्यांच्यावर 10 मार्च रोजी कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली होती. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तीन आरोपींना 29 एप्रिलला अटक करण्यात आली होती.