‘द केरळ स्टोरी’साठी रिक्षा मोफत, रिक्षा चालकाला मिळाली शिरच्छेद करण्याची धमकी

| Updated on: May 07, 2023 | 11:33 AM

The Kerala Story : देशात 'द केरळ स्टोरी' चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. काही जण या चित्रपटाचे समर्थन करत आहे तर काही जणांचा विरोध होत आहे. या चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांनी चित्रपट पाहण्यास जाणाऱ्यांसाठी सवलत दिली आहे. आता त्यांना धमक्या मिळत आहेत.

द केरळ स्टोरीसाठी रिक्षा मोफत, रिक्षा चालकाला मिळाली शिरच्छेद करण्याची धमकी
'द केरळ स्टोरी'साठी मोफत रिक्षा देणाऱ्या साधू मगर यांना धमकी
Image Credit source: tv9 network
Follow us on

पुणे : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट सध्या चर्चेत आहेत. केरळमधल्या मुलींचे बळजबरीने धर्मांतर करून नंतर त्यांना दहशतवादी बनवल्याची कथा या चित्रपटाची आहे. अनेकांकडून या चित्रपटासंदर्भात भाष्य केले जात आहे. मद्रास उच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी यापूर्वीच फेटाळून लावली आहे. दरम्यान पुणे, मुंबईत काही जणांनी हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्यांना मोफत रिक्षा सेवा सुरु केली आहे. यामुळे आता पुणे शहरातील रिक्षा चालकाला जीव मारण्याची धमकी मिळाली आहे.

कोणाला मिळाली धमकी

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांकडून पुण्यातील रिक्षाचालक साधू मगर भाडे घेत नाही. यामुळे आता कट्टरपंथींनी त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. त्यांना कॉल करुन आणि मेसेजद्वारे राजस्थानच्या कन्हैयालाल सारखी तुमची परिस्थिती करु, अशी धमकी दिली आहे. या धमक्या परदेशातून येत आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच धमकीचे पुरावेही दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

नंबर ब्लॉक केल्यावर वेगळ्या नंबरवरुन धमक्या

पुण्यातील ऑटो चालक साधू मगर यांनी 2 मे 2023 रोजी ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून पैसे न घेण्याची घोषणा करणारे पोस्टर बनवले होते. हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर एकीकडे त्याचे अनेकांनी कौतुक केले. दुसरीकडे त्यांच्या या निर्णयामुळे कट्टरपंथी लोकांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांनी धमकी येणारे नंबर ब्लॉक करायला सुरुवात केल्यावर वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत आहे. विशेष म्हणून साधू यापूर्वी भारतीय लष्करातील जवानांकडूनही रिक्षा भाडे घेत नाहीत.

पोलिसांना दिले पुरावे

साधू मगर यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. तसेच धमक्यांचे रेकॉर्डिंगही पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत त्यांना 15 वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आल्याचे सांगितले आहे. तक्रारीत त्यांनी व्हॉट्सअॅपचे काही स्क्रीनशॉटही दिले आहेत. साधू मगर यांनी सांगितले की, धमकी देणाऱ्याने आपल्याला उदयपूरच्या कन्हैयालालची आठवण करून दिली.

मद्रास न्यायालयाने फेटाळली याचिका

मद्रास उच्च न्यायालयात या चित्रपटासंदर्भात याचिका दाखल झाली होती. हा चित्रपट इस्लामच्या विरोधात नसून, आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या विरोधात असल्याचे सांगत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने असेही म्हटले होते की अनेक चित्रपटांमध्ये हिंदू संन्याशांना तस्कर आणि बलात्कारी म्हणून दाखवण्यात आले आहे, परंतु त्यांच्यावर कोणताही गदारोळ झाला नाही, त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचे कोणतेही समर्थन नाही.