पुणे (अभिजीत पोते) : आज भाऊबीज आहे. सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय नेते मंडळी सुद्धा भाऊबीज साजरी करतात. पंकजा मुंडे-धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे-अजित पवार या राजकीय क्षेत्रातील भाऊ-बहीणीच्या जोड्या सर्वांना माहित आहेत. भले, आज त्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या आहेत. पण भाऊ-बहिणीच नातं आजही त्यांच्यात कायम आहे. कौटुंबिक नाती, राजकारणाच्या पुढे असतात हे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी नेहमीच दाखवून दिलय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. दोन गट पडले. अजित पवार काल सकाळी गोविंद बागेत गेले नाहीत. पण रात्री त्यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आज पुन्हा भाऊबीज असल्याने ते शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत. राजकरणापलीकडे जाऊन नाती आहेत, हेच यातून दिसून आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार-सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच आणखी एक बहीण-भावाच नात आहे. जयंत पाटील आणि रुपाली चाकणकर. दरवर्षी भाऊबीजेला जयंत पाटील हे रूपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील हे रूपाली चाकणकर यांच्याकडे न चुकता भाऊबीजेसाठी जात आहेत. पण यंदा मात्र त्यात खंड पडला. सध्या जयंत पाटील आणि रूपाली चाकणकर हे वेगवेगळ्या गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही महिन्यांपूर्वी फूट पडली. जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर रूपाली चाकणकर या अजित पवार गटात आहेत.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
यंदा जयंत पाटील हे रुपाली चाकणकर यांच्याकडे भाऊबीजेला जाऊ शकले नाहीत. यामागे कुठलं राजकारण किंवा राजकीय मतभेद हे कारण नाहीय. स्वत: रुपाली चाकणकर यांनी याबद्दल माहिती दिलीय. “आज माझे बंधू जयंत पाटील आजारी असल्यामुळे भाऊबीजेला येऊ शकले नाहीत. पण त्यांनी मला फोनवरून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझे बंधू जयंत दादा पाटील लवकरच बरे होतील अशा शुभेच्छा” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलय.
बारामतीमध्ये साजऱ्या होणाऱ्या भाऊबीजेवर त्या काय म्हणाल्या?
बारामतीमध्ये भाऊबीज साजरी होतेय, त्यावरही रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पण नातेसंबंध आपापल्या ठिकाणी असतात. नात्यांमध्ये राजकारणाची गफलत करू नये. नाती जपली पाहिजेत, कुटुंब जोपासले पाहिजे. नाती जपली पाहिजेत, कुटुंब एकत्रित राहायला पाहिजे. बारामतीत सगळे एकत्र येत आहेत, याचा आनंदच आहे” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.