पुणे : ग्रामीण भागात मुली लग्न (Marriage) करण्यास तयार होत नाही. तसेच अनेक समाजात मुलींची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे मुलांचे लग्नाचे वय वाढत आहे. ग्रामीण भागातील अनेक मुलांना एजंटमार्फत विवाह जुळवावे लागत आहे. त्यासाठी एजंटांना लाखो रुपये दिले जात आहे. परंतु एजंटांमार्फत लग्न देऊन नंतर फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. लग्न करुन नंतर सासरच्या मंडळींनी दिलेले दागिने (Jewelry) अन् घरातील मिळेल ती रोकड (Cash) लंपास करण्याच्या तीन घटना पुणे जिल्ह्यात उघड झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलिसात दाखल गुन्ह्यात तीन जणांना अटक झाली आहे. यातील दोन एजंट असून एक नवविवाहीत वधू आहे. लोणी येथील एका युवक गणेश किशन महाडिक (30) याने यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर सीमा भारती, नीलेश शंकर भारती व शिवांजली देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.
नेमके काय झाले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश महाडिक हे शेतकरी आहेत. एका लग्न समारंभात सीमा आणि नीलेशशी त्याची ओळख झाली. त्यावेळी गणेशसाठी एक मुलगी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवांजलीसोबत लग्न केले. त्यानंतर त्यांनी गणेश महाडिक यांच्याकडून 2 लाख 32 हजार रुपये घेतले. काही दिवसांनी आरोपीने त्यांच्या घरी येऊन पत्नीला घटस्फोट दे, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घटस्फोट झाल्याचे लिहून घेतले. त्यानंतर तिघे तेथून पसार झाले.
तीन जणांची केली फसवणूक
आरोपींनी अशाच प्रकारे तीन तरुणांची फसवणूक केली आहे, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक घोडके यांनी सांगितले. आरोपी आधी लग्न समारंभाला जातात. तिथे लग्नासाठी इच्छुक असलेले तरुण शोधतात. यानंतर त्यांना लग्नाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक करतात. यापूर्वी यवत पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.