पुणे : सध्या पावसाने ओढ दिली आहे. मान्सूनच राज्यात आगमन झालय. पण मान्सून अजून सक्रीय झालेला नाही. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. राज्यातील जनता उन्हाची काहिली आणि वाढत्या उकाड्यामुळे हैराण आहेच. पण आता पाणी टंचाईची समस्या तीव्र होऊ लागली आहे. साधारणात: जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून सक्रीय होतो. पण अजून धुवाधार पावसाला सुरुवात झालेली नाही. म्हणाव्या तशा पावसाच्या सरी कोसळत नाहीयत. परिणामी नागरिकांवर पाण्य़ासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
पुणे जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस लांबल्याचे परिणाम दिसतायत. सध्या लगेच या परिस्थितीत सुधारणा होण्याची कुठलीही चिन्ह नाहीयत. पुण्यात धरणातील पाणीसाठा आटत चाललाय.
यावर्षी उलट चित्र
पुण्यात जूनच्या अखेरपर्यंत टँकरची मागणी कमी झालेली असते. कारण मान्सून सक्रीय झालेला असतो. पण यावर्षी उलट आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत चालू महिन्यात टँकरची मागणी वाढली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दिवसाला टँकरच्या किती फेऱ्या?
पुण्याच्या तीन तालुक्यातील 67 गावं पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. आंबेगाव, जून्नर आणि खेड या तीन तालुक्यातील 67 गावात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलय. या टँकरच्या दिवसाला 136 फेऱ्या होत आहेत. आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक 16, खेड 13 आणि जुन्नरमधील 10 गावं वॉटर टँकरवर अवलंबून आहेत.
पुण्यात कधी येणार पाऊस?
मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील विहिरी आणि धरणातील पाणीसाठा आटत चाललाय, त्यामुळे टँकरची मागणी वाढल्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं. मागच्यावर्षी 16 जूनला 59 गावातील 308 खेडेगावात 66 टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. चालूवर्षाशी तुलना करता टँकरची संख्या 44 आहे. पण पाण्याची मागणी करणाऱ्या गावांची संख्या 67 आहे. यंदा पुण्यात मान्सूनच्या आगमनाला 10 दिवसांचा विलंब झालाय. 22 जूनला पुण्यात मान्सूनच्या धारा बरसतील अशी अपेक्षा आहे.