पुणे : भारतीय रेल्वे हा सर्वात स्वस्त आणि मस्त वाहतुकीचा पर्याय आहे. परंतु त्यानंतरही रेल्वेत तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडून वेळोवेळी मोहीम राबवली जाते. रेल्वेच्या या प्रयत्नांमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांना चांगला दंड बसतो. परंतु त्यानंतरही या प्रवाशांची संख्या कमी होत नाही. यामुळे गेल्या वर्षभरात फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने बंपर दंड वसुल केला आहे. त्यात सर्वाधिक कमाई मुंबई विभागाने केली आहे. म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
वर्षभरात ३०० कोटींचा दंड
रेल्वेतून सर्व तिकीट धारक आणि पासधारकांना आरामदायी प्रवास व्हावा आणि त्यांना उत्तम सेवा मिळावी यासाठी फुकट्या प्रवाशांना आळा घालण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरु आहे. रेल्वेकडून सर्व विभागांमधील उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी केली जाते. तिकीट तपासणीच्या कामगिरीत मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. एकूण ४६.३२ लाख प्रकरणे दंडित करण्यात आली आणि आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये ३०० कोटी रुपये कमावले आहेत.
मुंबईने ओलांडला १०० कोटी रुपयांचा टप्पा
तिकीट तपासणी कमाईमध्ये मध्य रेल्वेने सर्व विभागीय रेल्वेंना मागे टाकून मुंबईने प्रथम क्रमांक पटकवला आहे. रेल्वेने एकूण ३०० कोटींचा दंड वसूल केला आहे, त्यात एकट्या मुंबई विभागाने १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
• मुंबई विभागाने ₹१०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि १९.५७ लाख प्रकरणांमधून ₹१०८.२५ कोटी कमावले आहेत.
• पुणे विभागाने ३.३६ लाख प्रकरणांमधून ₹ २४.२७ कोटी कमावले आहेत.
• नागपूर विभागाने ६.१६ लाख प्रकरणांमधून ₹ ३९.७० कोटी कमावले आहेत
• भुसावळ विभागाने ९.०६ लाख प्रकरणांमधून ₹ ७०.०२ कोटी कमावले आहेत.
• सोलापूर विभागाने ५.२७ लाख प्रकरणांमधून ₹ ३३.३६ कोटी कमावले आहेत.
• PCCM पथकाने २.९१ लाख प्रकरणांमधून ₹ २४.६५ कोटी कमावले आहेत.
हे आहेत टॉप ३
मध्य रेल्वेच्या २० तिकीट तपासकांनी वैयक्तिकरीत्या एक कोटींहून अधिक रकमेचा दंड वसूल केला आहे. यात प्रथम तीन तिकीट तपासणी करणारे डी. कुमार यांनी २२,८४७ प्रकरणांमधून २ कोटी ११ लाख ७ हजार ८६५ रुपये दंड वसूल केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर एस. बी. गलांडे आहेत. त्यांनी २२,३८४ प्रकरणांमधून १ कोटी ९७ लाख ८७ हजार ४७० रुपये दंड वसूल केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर सुनील नैनानी आहेत. त्यांनी १८,१६५ प्रकरणांमधून १ कोटी ५९ लाख ९८ हजार १९० रुपयांची कमाई करण्याचा मान मिळाला आहे.