पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : हिमाचल प्रदेशात मागील आठवड्यात महापूर आला होता. सर्वत्र पाणीच पाणी होते. गावे पाण्याखाली बुडाली होती. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले होते. राज्यातील जवळपास ८२८ रस्ते बंद झाली होती. वीज पुरवठा खंडीत झाला होता. इंटरनेट नव्हते. कोणतीही बातमी मिळण्याचे साधन नव्हते अन् आपण कसे आहोत, हे कुटुंबियांना सांगण्यासाठी कुठे जाता येत नव्हते, या परिस्थितीचा अनुभव पुणे शहरातील जोडप्याने घेतला. हिमाचलमध्ये पर्यटनासाठी देशभरातून आलेले अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यात पुण्यातील १७ जण होते.
पुणे शहरातील सोनिया रोहरा हिचा वाढदिवस ५ जुलै रोजी होता. तिचे पती लोकेश पंजाबी यांनी पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी हिमाचल प्रदेशात पर्यटनाची योजना आखली. पत्नीला वाढदिवसाचे सरप्राईज त्यांना द्यायचे होते. त्यामुळे तिकीट काढण्यापासून हॉटेल बुकींगपर्यंत सर्व नियोजन पत्नीला न सांगता केले. अन् पुण्यात वाढदिवस साजरा करुन ७ जुलै रोजी हिमाचल प्रदेशकडे निघाले. सोनिया एका मार्केटींग कंपनीत मॅनेजर तर लोकेश आयटी कंपनीत कार्यरत आहेत.
८ जुलै रोजी हे जोडपे कासोल येथे पोहचले. त्यावेळी पाऊस सुरु झाला होता. मनालीत पोहचेपर्यंत मुसळधार पाऊस सुरु झाला. मनालीला आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी फिरण्यासाठी निघाले. परंतु काही अंतरावर गेल्यावर रस्ते बंद पडले होते. मग पुन्हा माघारी मनालीत आले. १० जुलै रोजी मनालीत परत आल्यावर त्यांना आढळले की अनेक जोडप्यांची परिस्थिती त्यांच्यासारखी झाली आहे. मोबाईल फोनला सिग्नल नाही, इंटरनेट नाही, वीज पुरवठा नाही, बातम्यांच्या अपडेट्स नाही, अशी परिस्थिती होती. सर्वत्र फक्त मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे विक्राळ रुप धारण करणारी बियास नदी होती.
दुसऱ्या दिवशी रस्ते खचलेले आहे, अशी माहिती लोकश पंजाबी यांना मिळाली. हे रस्ते दुरुस्त होण्यासाठी पंधरा दिवस लागणार असण्याचे सांगण्यात आले. या परिस्थितीचा फायदा घेऊन हॉटेल मालकांनी हॉटेलमध्ये दर वाढवले. मग बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुदैवाने पाऊस कमी झाला होता. काही सहप्रवाशांसोबत शेअर गाड्या करुन चंदीगड गाठले. त्यानंतर पुण्यात परतले. परंतु ते तीन दिवस निसर्गाच्या प्रकोपामुळे वेगळ्या अर्थाने संस्मरणीय राहतील, असे लोकेश पंजाबी यांनी सांगितले.